अचलपूर नगरपालिकेकडून बांधकामासाठी आता ऑनलाईन परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:40+5:302021-06-27T04:09:40+5:30
बीपीएमएस प्रणाली अपडेट : परतवाडा : अचलपूर नगरपालिकेकडून बांधकामासाठी आता ऑनलाईन परवानगी दिली जात आहे. याकरिता आवश्यक असणारी ...
बीपीएमएस प्रणाली अपडेट :
परतवाडा : अचलपूर नगरपालिकेकडून बांधकामासाठी आता ऑनलाईन परवानगी दिली जात आहे. याकरिता आवश्यक असणारी बीपीएमएस प्रणाली सर्वप्रथम अपडेट करून कार्यान्वित करणारी अचलपूर नगरपालिका राज्यात पहिली ठरली आहे.
एकत्रितकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अंतर्गत ही ऑनलाइन बीपीएमएस प्रणाली नगरपालिकेने अपडेट केली आहे. महाआयटीने तयार केलेल्या संगणकीय प्रणालीनुसार १ एप्रिलपासून बांधकाम परवानगी देण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले होते.
ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, नागपूर, कोल्हापूर महानगरपालिकांसह सावंतवाडी, भुसावळ, बीड, अचलपूर, वर्धा व बारामती नगर परिषद आणि रायगड, अहमदनगर, लातूर, अमरावती, चंद्रपूर व सातारा प्रादेशिक योजना क्षेत्रांकरिता हे निर्देश देण्यात आले होते. यात अ वर्ग नगर परिषद अंतर्गत सर्वप्रथम ही कार्यप्रणाली अचलपूर नगर परिषदेने कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे कोणत्याही प्रकारच्या विकासकामांना परवानगी देण्याचा कालावधी कमी झाला आहे. कामाची गती वाढविणे शक्य झाले आहे. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यास ही प्रणाली उपयुक्त ठरत आहे. याकरिता परवानगी अर्ज दाखल करतेवेळी सर्व आवश्यक दस्तावेज अभियंत्यांमार्फत ऑनलाईन दाखल करणे मात्र आवश्यक आहे.
अचलपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या मार्गदर्शनात सहायक रचनाकार मृणालिनी पाटील, रचना सहायक शिवम देशमुख व सोमेश धड यांनी वेळेत ही बीपीएमएस प्रणाली अपडेट करून कार्यान्वित केली आहे. यांच्या प्रयत्नांमुळेच बीपीएमएस प्रणालीवर ऑनलाइन इमारत बांधकाम परवानगी देणारी अचलपूर नगर परिषद राज्यात प्रथम ठरली आहे.