विद्यापीठात आॅनलाईन सेवेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 01:45 AM2019-08-21T01:45:54+5:302019-08-21T01:46:21+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मोठा गाजावाजा करून आॅनलाईन सेवेचा प्रारंभ झाला. मात्र, या सेवा केवळ विद्यापीठाच्या संकेत स्थळावर शोभेपुरत्या ठरल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगातून आॅनलाइन सेवेसाठी खर्च झालेले ७२ लाख रुपये वाया तर गेले नाही, अशी ओरड सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मोठा गाजावाजा करून आॅनलाईन सेवेचा प्रारंभ झाला. मात्र, या सेवा केवळ विद्यापीठाच्या संकेत स्थळावर शोभेपुरत्या ठरल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगातून आॅनलाइन सेवेसाठी खर्च झालेले ७२ लाख रुपये वाया तर गेले नाही, अशी ओरड सुरू झाली आहे.
आॅनलाइन सेवा सुरू व्हावी, यासाठी डॉटकॉम कंपनीकडे जबाबदारी सोपविण्यात आली. त्याकरिता मॉड्युल्स तयार देण्याबाबतचा करार करण्यात आला. डॉटकॉमकडून योग्य रीत्या कामे करून घेण्यात विद्यापीठ प्रशासन यशस्वी ठरले. फाइल ट्रॅकिंग नावाचे अप्लिकेशन विद्यापीठाच्या संकेत स्थळावर असले तरी हे अप्लिकेशन कार्यान्वीतच नसल्याचे विद्यापीठाच्या आॅनलाइन सेवा केवळ नावापुरत्या असल्याची ओरड आता कर्मचारी, अधिकाऱ्यांमधून सुरू झाली आहे. माहिती अधिकाराचा अर्ज सादर करताना अनंत अडचणी येत आहेत. अर्ज योग्यरीत्या भरला जातो. मात्र, त्याचे आॅनलाइन पेमेंट करण्यासाठी गेल्यानंतर पेमेंटची लिंकच उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपासून डॉटकॉम कंपनीला सदर काम बहाल केले आहे. मात्र, या कंपनीचा कारभार कासवापेक्षाही धिम्या गतीने चालत असल्याने विद्यापीठाच्या आॅनलाइन सेवा सुरू होण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
अडीच वर्षांनंतरही आॅनलाईन सेवा नाही
विद्यापीठाला काटेकोरपणे नियमांचे पालन करून कामकाज केले जाते. प्रत्येक वेळी अधिकारी, कर्मचारी नियमांचे दाखले देतात. आॅनलाइन सेवा वर्षभरात सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही ही सेवा सुरू झाली नाही. विद्यापीठाच्या संकेत स्थळावर आॅनलाइन मॉड्युुल्सचे निव्वळ देखावे सादर केलेले असून काही मॉड्युुल्स वगळता अन्य मॉड्युुल्स प्रत्यक्षात कार्यरत नाहीत. त्यामुळे कुलसचिवांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
‘डॉटकॉम’च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
डॉटकॉम कंपनीला आॅनलाइन सेवांचे कामे देण्यात आले आहे. आतापर्यंत कामे पूर्णत्वास आले नाही. जे काही सुरू झाले, यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. वित्त विभागाचे कामकाज आॅनलाइन करण्यासाठी विद्यापीठ गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नरत आहे. मात्र, ते आॅनलाइन केव्हा होणार, हा प्रश्न कायम आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर हे सातत्याने त्यासाठी प्रयत्नशिल आहेत. तथापि, या कंपनीकडून मात्र अपेक्षित काम पूर्ण होत नसल्याने कंपनीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.