महिलेचा ऑनलाइन पाठलाग; फेसबुकवर प्रपोझ करून पाठवली किसिंग इमोजी अन्...
By प्रदीप भाकरे | Published: July 21, 2024 05:13 PM2024-07-21T17:13:44+5:302024-07-21T17:14:49+5:30
आरोपी तिलक ठाकूर याने फिर्यादी महिलेस १९ जुलै रोजीच्या पहाटे ३:४१ पासून रात्री १२ पर्यंत अनेक मेसेज पाठविले...
अमरावती : फेसबुक अकाउंटवरून प्रपोझ अन् किसिंग इमोजी पाठवत एका महिलेचा ऑनलाइन पाठलाग करण्यात आला. तिने भाव न दिल्याने खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकीदेखील त्याने दिली. १९ जुलै रोजी पहाटे चार ते २० जुलै रोजीच्या सकाळी ७:१२ पर्यंत ती ऑनलाइन पाठलागाची घटना घडली. याप्रकरणी, राजापेठ पोलिसांनी २० जुलै रोजी रात्री आरोपी तिलक ठाकूर (रा. अमरावती) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, १९ जुलै रोजी पहाटे यातील फिर्यादी ही झोपेतून उठली. काही वेळाने तिने मोबाइल पाहिला असता तिला तिचा मित्र तिलक ठाकूर याच्या फेसबुक अकाउंटवरून तिच्या फेसबुक अकाउंटवर ‘आय लव्ह यू’ तसेच किस इमोजी दिसून आले. आय लाइक यू, मै तुमसे प्यार करता हू, असादेखील मेसेज दिसून आला. तो एवढ्यावरच न थांबता त्याने व्हाइस कॉलवर तिला उद्देशून गाणेदेखील म्हटले. आरोपी तिलक ठाकूर याने फिर्यादी महिलेस १९ जुलै रोजीच्या पहाटे ३:४१ पासून रात्री १२ पर्यंत अनेक मेसेज पाठविले.
मला सहकार्य कर
२० जुलै रोजी सकाळी ७:१२ च्या सुमारासदेखील आरोपीने ‘गुड मॉर्निंग’ असा मेसेज पाठविला. मी तुमच्या रिप्लायची वाट पाहतो, असे म्हणून महिलेचा छुपा पाठलाग करून खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली. मला सहकार्य कर, अशी धमकीदेखील त्याने दिल्याने पीडिता नखशिखांत हादरली. त्यामुळे तिने सायंकाळच्या सुमारास राजापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला.