मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाला भेट देणा-या पर्यटकांची नोंद होणार आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 05:36 AM2017-09-18T05:36:07+5:302017-09-18T05:36:10+5:30
मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाला भेट देणा-या पर्यटकांची आता आॅनलाइन नोंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेशद्वारावर पर्यटकांचा ‘बायोडाटा’ टिपण्यात येणार असून दिवसभरात किती जणांनी भेटी दिल्यात, याची माहिती आॅनलाइन प्रसारित करणार आहे
गणेश वासनिक
अमरावती : मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाला भेट देणा-या पर्यटकांची आता आॅनलाइन नोंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेशद्वारावर पर्यटकांचा ‘बायोडाटा’ टिपण्यात येणार असून दिवसभरात किती जणांनी भेटी दिल्यात, याची माहिती आॅनलाइन प्रसारित करणार आहे.
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी सर्वांत मोठा प्रकल्प असलेल्या मेळघाटात ४० ते ४५ वाघ आहेत. मात्र अन्य प्रकल्पांच्या तुलनेत पर्यटकांची गर्दी खेचण्यात हा प्रकल्प कमी पडत आहे. त्यामुळे पर्यटकांची नोंद ठेवण्यासाठी ‘फॉरेस्ट ट्रान्झिट पास’ आॅनलाइन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख विकास प्रबोधिनी प्रशिक्षण संस्थेत पार पडलेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ वनाधिकाºयांच्या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला.
व्याघ्र प्रकल्पाचा कारभार आॅनलाइन करताना प्रवेशद्वारावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविले जातील. जेणेकरून प्रवेशद्वारातून कोणत्या वाहनांची ये-जा झाली, किती पर्यटकांनी भेटी दिल्या, हे आता एका ‘क्लिक’वर कळू शकेल.
- एम. एस. रेड्डी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प