अमरावती विद्यापीठात कौशल्य विकासाचे आॅनलाईन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:05 AM2018-05-17T11:05:02+5:302018-05-17T11:05:13+5:30
देशभरात २७ विद्यापीठांना मंजूर झालेल्या केंद्रापैकी कौशल्य विकास हा महत्त्वाचा विषय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला दिलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राचार्य आणि शिक्षकांना कौशल्य विकासाचे आॅनलाईन प्रशिक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने देशभरातील विद्यापीठांमध्ये विविध महत्वपूर्ण शैक्षणिक विषयांवर राष्ट्रीय ज्ञानस्रोत केंद्र (एनआरसी) मंजूर केले आहे. देशभरात २७ विद्यापीठांना मंजूर झालेल्या केंद्रापैकी कौशल्य विकास हा महत्त्वाचा विषय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला दिलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कौशल्य विकासाला चालना दिली असून, अमरावती विद्यापीठाला मिळालेल्या एनआरसी केंद्राच्या माध्यमातून आता देशभरातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांच्या प्राचार्य व शिक्षकांना कौशल्य विकासाचे आॅनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. केंद्रीय विद्यापीठ आयोगाने नुकतीच देशभरातील विद्यापीठांचे कुलगुरू आणि मनुष्यबळ विकास केंद्राच्या संचालकांची दिल्ली येथे बैठक घेतली. त्या बैठकीत एनआरसी कार्यान्वयासंदर्भात माहिती दिली. यापूर्वी विद्यापीठात मानव संसाधन विकास केंद्राची स्थापना झाली असून, त्या केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षकांना उद्बोधन व उजळणी वर्गाला आमंत्रित केले जायचे. महिनाभर चाललेल्या प्रशिक्षणात शिक्षकांचा पूर्ण वेळ व्यतीत व्हायचा. राष्ट्रीय ज्ञानस्रोत केंद्रामुळे आॅनलाईन प्रशिक्षण प्राप्त होत असल्यामुळे शिक्षकांचा वेळ व शासनाच्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे. विद्यापीठाला दिलेल्या कौशल्य विकास या अभ्यासक्रमाकरिता एनआरसी अंतर्गत स्वतंत्र विद्वत परिषदेचे गठण होणार असून, त्यामध्ये इतर नामांकित संस्थांमधून पाच सभासद आणि तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश असेल. विद्वत परिषदेच्या माध्यमातून अद्ययावत ओरिएन्टेशन मॉड्यूल्स दरवर्षी तयार केले जातील. याशिवाय प्रशिक्षण देण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून रिसोर्स पर्सनची निवड केली जाणार आहे. ‘स्वयम्’ या आॅनलाईन प्रशिक्षण सुविधेच्या माध्यमातून शिक्षक त्यांच्या सोयीनुसार अभ्यासक्रम पूर्ण करतील. त्यांची परीक्षा आॅनलाईन होईल व त्यानंतर आयोगाचे प्रमाणपत्र मिळेल.
शिक्षकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण राष्ट्रीय ज्ञानस्त्रोत केंद्राच्या माध्यमातून मिळणार असल्यामुळे त्याचा फायदा विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थी रोजगारक्षम होतील, असा विश्वास कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केला.