आजपासून विद्यापीठाच्या ऑनलाइन हिवाळी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:22 AM2021-05-05T04:22:18+5:302021-05-05T04:22:18+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी-२०२० नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा ५ मेपासून प्रारंभ होत आहेत. एकंदर अडीच ...

Online winter exams of the university from today | आजपासून विद्यापीठाच्या ऑनलाइन हिवाळी परीक्षा

आजपासून विद्यापीठाच्या ऑनलाइन हिवाळी परीक्षा

Next

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी-२०२० नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा ५ मेपासून प्रारंभ होत आहेत. एकंदर अडीच लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. मोबाईल, डेस्कटॉप, लॅपटॉपद्वारे ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन परीक्षांच्या अनुषंगाने सुविधा नाही, अशांना महाविद्यालयांनी व्यवस्था करून द्यावी लागणार आहे.

अमरावती विद्यापीठाशी संलग्न ३८४ महाविद्यालयांत ही परीक्षा होऊ घातली आहे. परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर होत असल्याने प्रश्नपत्रिका विद्यापीठातून उपलब्ध होणार आहे. ऑनलाइन परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलींच्या आधारे (एमसीक्यू) होत आहे. ५ मे ते ६ जून दरम्यान परीक्षा होणार असून, ६०० अभ्यासक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेत प्रत्येक अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळे गुण दिले जातील. ८० गुणांच्या विषयासाठी प्रश्नपत्रिकेतील ४० पैकी ३० प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. विषयांचे गुण, प्रश्नपत्रिकेतील गुण आणि परीक्षार्थींनी सोडविलेल्या प्रश्नानुसार गुणांकन होणार आहे. ऑनलाइन परीक्षा बाह्य यंत्रणेमार्फत न घेता महाविद्यालय स्तरावर घेण्यात येत आहे. परीक्षा महाविद्यालयात तर गुण विद्यापीठ देणार, असे या परीक्षांचे वैशिष्ट्य असणार आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी परीक्षा मंडळाचे सहकार्य घेण्यात आले आहे.

-------------------

एकाच वेळी सुरू होणार परीक्षा

विद्यापीठ अंतर्गत सर्वच महाविद्यालयांत एकाच वेळी ऑनलाइन परीक्षा सुरू होेतील, अशी तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक महाविद्यालयाला स्वतंत्र पासवर्ड देण्यात आला आहे. ६०० अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे अचूक नियोजन करण्यासाठी परीक्षा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका महाविद्यालयात पाठविण्यात आल्या आहेत.

--------------------

स्वयंचलित मू्ल्यांकन

ऑनलाइन परीक्षांची व्यवस्था करताना विद्यापीठाने स्वयंचलित मूल्यांकन होईल, असे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रश्नांची उत्तरे ओके केली की, ते उत्तर डेटा बेसच्या ऑप्शनमध्ये असल्यास स्वयंचलित गुण देण्याची प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नव्याने मूल्यांकन करण्याची गरज असणार नाही, अशी अद्ययावत व्यवस्था विद्यापीठाने तयार केली आहे.

-----------------------

परीक्षेच्या कालावधीत उघडणार लिंक

ऑनलाइन परीक्षांचे वेळापत्रक विद्यार्थी, महाविद्यालयांना देण्यात आले आहे. त्यानुसार परीक्षा असलेल्या वेळेतच लिंक ओपन होईल, अन्यथा दुसऱ्या वेळेत लिंक उघडणार नाही, अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. हिवाळी २०२० नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा दरदिवशी तीन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे.

------------------------

कोट

विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांचे नियोजन करताना बाह्य यंत्रणा नियुक्त केली नाही. महाविद्यालयांवर परीक्षांची जबाबदारी सोपविताना मू्ल्यांकन स्वयंचलित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अचूक प्रश्न सोडविले, तरच गुण मिळतील, अशी प्रणाली आहे. प्रतिविद्यार्थी १० रुपये परीक्षांसाठी महाविद्यालयांना दिले जातील.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग.

Web Title: Online winter exams of the university from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.