१००‘कोरोना’ पॉझिटिव्ह पैकी पाच जणांनाच धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 05:00 AM2020-03-09T05:00:00+5:302020-03-09T05:00:15+5:30
पाच रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळत असल्याने त्यांना तातडीने उपचार घेणे गरजेचे असते. जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळलेला नाही, हे विशेष. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘कोरोना’ व्हायरसचा संसर्ग झालेल्या १०० पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८१ रुग्ण साधारण असतात, त्याचा कुठलाही धोका नसतोे. १४ जणांमध्ये त्याची सोम्य लक्ष्णे आढळतात. मात्र, काळजी घ्यावी लागते. परंतु पाच रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळत असल्याने त्यांना तातडीने उपचार घेणे गरजेचे असते. जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळलेला नाही, हे विशेष. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
एखादी व्यक्ती जर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आली असेल व त्यानंतर त्याला ताप, सर्दी, खोकला, अशी लक्षणे आढळून येत असतील तर त्याने तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करावी. अशा रुग्णांचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीकरिता नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात येतात. परंतु कुठलाही व्यक्ती जर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात नसेल व त्याला साधारण ताप सर्दी, खोकला, अशी लक्षणे असतील तर त्यांनी घाबरू नये. आतापर्यंत चारजण विदेशातून परतले. त्यापैकी तीन जण चीनमधून, तर एक हाँगकाँगहून आले आहे. पैकी दोघांना सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळल्याने त्यांचे ‘थ्रोट स्वॅब’ पुणे व नागपूर येथे पाठविले होते. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. २९ जानेवारीचा स्वॅब पुणे येथे, तर १० फेब्रुवारीचा स्वॅब नागपूर येथे पाठविले होते. चारही नागरिकांना १४ दिवस त्यांच्या घरी वैद्यकीय निगराणीत ठेवले होते. ‘कोरोना’ संशयित रुग्णांकरिता इर्विनमध्ये आयसोलेशन कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
जिल्ह्यात जरी एकही ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसला तरी खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. शिंकताना किंवा खोकलताना तोंडावर रुमाल ठेवावा. खुर्ची, टेबल किंवा इतर वस्तुनांना हात लागत असल्याने हात नेहमी स्वच्छ धुवावे. ताप, सर्दी, खोकला असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी. यामध्ये नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे असून, शक्यतोवर हस्तांदोलन करण्याचे टाळावे.
संशयितांची लक्षणे
एखादी व्यक्ती जर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आली असेल व त्याला ताप, खोकला, किंवा सर्दी अशी लक्षणे असतील तर ती ‘कोरोना’ संशयित रुग्णांची लक्षणे मानली जातात. त्यांनी तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावून थ्रोट स्वॅप तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामध्ये संशयित असला तरी पण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे स्वॅप तपासणी नंतरच ठरते.
‘कोरोना’ व्हायरस आठ तास राहतो वातावरणात
‘कोरोना’ हा व्हायरस साधारणत: आठ तास वातावरणात जिवंत राहतो. त्यामुळे त्याचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असतो. पॉझिटिव्ह रुग्ण शिंकताना त्याने रुमालाला हात लावल्या तो हात तो ज्या ठिकाणी लागेल, उदा. खुर्ची, बायोमेट्रिक, टेबल, इतर वस्तूला दुसऱ्याने हात लावल्यास त्यालासुद्धा संसर्गाचा धोका असतो. याचा प्रादुर्भाव हवेतून सुद्धा होतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात एकही ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. चार नागरिक विदेशातून जिल्ह्यात आले होते. त्यापैकी दोन संशयितांचे थ्रोट स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या आजारात १०० पॉझिटिव्ह रुग्णांपैैकी फक्त पाच जणांनाच तीव्र स्वरुपाचा धोका राहू शकतो. जिल्ह्यात कुठलाही रुग्ण नसल्याने नागरिकांनी घाबरू नये, पण खबरदारी व सतर्कता बाळगली पाहिजे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हाशल्यचिकित्स अमरावती