सर्व विषयांसाठी एकच पुस्तक
By admin | Published: February 16, 2017 12:09 AM2017-02-16T00:09:24+5:302017-02-16T00:09:24+5:30
शालेय शिक्षण घेताना वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. त्यामुळे विविध आजारांनी विद्यार्थी ग्रासला आहे.
शिक्षकाची कल्पकता : दप्तराचे ओझे झाले कमी, कार्यशाळेत दिली माहिती
चांदूरबाजार : शालेय शिक्षण घेताना वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. त्यामुळे विविध आजारांनी विद्यार्थी ग्रासला आहे. या दप्तराचा भार कमी करण्यासाठी स्थानिक बापूसाहेब देशमुख शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने अनोखा उपक्रम राबविला. याशाळेचे शिक्षक नीलेश चाफलेकर नामक शिक्षकाने इयत्ता सातवीचे घटक चाचणी व सत्र परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार एकच संयुक्त पुस्तक तयार करून यासर्व पुस्तकाचा भार केवळ ३०० ग्रॅमवर आणला. याअभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे झाले आहे.
याअनोख्या कार्यशाळेचे उद्घाटन चांदूररेल्वे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार रविंद्र मेंढे, गुड्डू शर्मा, तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रदीप तळोकार, प्राचार्य विलास मायंडे, पर्यवेक्षक विनोद उतखेडे, किशोर वाघ आदींची उपस्थिती होती. यावेळी सहायक शिक्षक नीलेश चाफलेकर यांना दप्तराचा भार कमी करण्याची कल्पकता सुचली. प्राचार्य मायंडेनी त्यांना प्रोत्साहन दिले. चाफलेकर यांनी काम हाती घेतले. इयत्ता ७ वीला सात विषय आहेत. विद्यार्थ्यांच्या दररोज ९ तासिका होतात. त्यासाठी त्यांना सर्वविषयांची पुस्तके शाळेत आणावी लागतात. त्यामुळे दप्तरांचा भार वाढतो. तो भार कमी करण्यासाठी चाफलेकर यांनी सातवीचे प्रत्येक विषयाचे प्रथम व व्दितीय घटक चाचणी तसेच प्रथम व व्दितीय सत्र परीक्षा याप्रमाणे अभ्यासक्रमाचे युनिट वेगळे केले. प्रथम, व्दितीय घटक चाचणी तसेच प्रथम व व्दितीय सत्राप्रमाणे चार पुस्तकाचे संच तयार केले. यामुळे विद्यार्थ्यांना घटक व सत्रानुसार अभ्यास करणे सोपे झाले
याप्रमाणे वर्ग १ते९ च्या अभ्यासक्रमाचे एकच संकलित पुस्तक तयार करता येणार आहे. संकलित पुस्तके तयार करण्याची कार्यशाळा शाळेत घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांची पुस्तके स्वत: तयार केली. हा स्तुत्य उपक्रम राज्य शासन स्तरावर राबविला जावा, यासाठी प्रयत्न केले जातीलव. पुस्तकनिर्मितीची प्रत्यक्ष पाहणी मान्यवरांनी केली. प्रास्तविक किशोर वाघ तर संचालन समीर ढेकेकर व आभार अभय देशमुख यांनी मानले.
राज्यस्तरावर राबविला जावा उपक्रम
सहायक शिक्षक नीलेश चाफलेकर यांनी तयार केलेले पुस्तक खरोखरच आगळेवेगळे आहे. विद्यार्थ्यांसाठी तर ते सोयीचे आहेच पण यामुळे त्यांचे दप्तराचे ओझे खरोखरीच कमी होणार आहे. त्यामुळे हा उपक्रम राज्यस्तरावर राबविता येऊ शकतो. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी याची शिफारस राज्य पातळीवर करणार आहेत.