उमेदवारासह पाच लोकांनाच प्रचाराची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:12 AM2020-12-22T04:12:23+5:302020-12-22T04:12:23+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाच्या काळात होत असलेल्या ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत प्रचारादरम्यान संसर्ग वाढू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. ...
अमरावती : कोरोना संसर्गाच्या काळात होत असलेल्या ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत प्रचारादरम्यान संसर्ग वाढू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. यात उमेदवारासह केवळ पाच व्यक्तींच्या गटाला घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी मिळणार आहे. याशिवाय केवळ तीन वाहने वापरण्याची अनुमती मिळणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
निवडणुकीदरम्यान नागरिकांनी एकत्र येणे, मिरवणुकीचे आयोजन करणे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांद्वारा निकष लावण्यात आले आहे. मेळाव्याच्या प्रवेसासाठी बाहेर पडण्याची स्वतंत्र व्यवस्था असणाऱ्या मैदानाची पााहणी करण्यात येणार आहे. याशिवाय सामाजिक अंतराच्या दृष्टीने चिन्हांकित खुणा करण्यात येणार आहे. कोरोनासंदर्भातील मार्गदर्शन तत्त्वे पाळली जातात की नाही, याविषयी नोडल अधिकारी लक्ष देणार आहेत. उमेदवारांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या खबरदारीसाठी फेसमास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग आदींच्या पुर्ततेची शहानिशा करावी लागणार आहे. या तरतुदीचे उल्लंघन झाल्यास भादंविचे कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
मतदान केंद्रावर कार्यरत अधिकारी/ कर्मचारी तसेच सुरक्षारक्षकांना फेसमास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड व ग्लोव्हज पुरविण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या मतदारांच्या बाबतीत स्वतंत्रपणे मार्गदर्शक सुचना जारी करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
बॉक्स
मतदान एजंट, मतमोजणी प्रतिनिधींनाही बंधणे
मतदान केंद्रात मतदान एजंट किंवा मतमोजणी प्रतिनिधीचे तापमान निर्धारित विहित मर्यादेपेक्षा अधिक असल्यास मतदान केंद्राधिकाऱ्यांच्या परवानगीने त्यांच्या राखीव एजंटला त्यांचे काम सोपविण्यात येईल. शक्य असेल तेथील मतदान केंद्रावर बुथ ॲपचा वापर करावा लागणार आहे. याशिवाय दर्शनी भागात कोरोना जागरुकतेबाबत पोष्टर्स लावण्यात येणार आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन होण्याकरिता बीएलओ स्वयंसेवकांचीही मदत घेण्याच्या सुचना आहेत.