-तर माणसांनाही द्यावे लागेल मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:03 AM2017-08-05T00:03:23+5:302017-08-05T00:03:50+5:30
‘ग्लँडर्स’चा संसर्ग रोखण्यासाठी पशूवैद्यक शास्त्रात कोणतीच लस अथवा औषधी उपलब्ध नसल्याने हा आजार असाध्य मानला गेला आहे.
प्रदीप भाकरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘ग्लँडर्स’चा संसर्ग रोखण्यासाठी पशूवैद्यक शास्त्रात कोणतीच लस अथवा औषधी उपलब्ध नसल्याने हा आजार असाध्य मानला गेला आहे. ज्याप्रकारे अडुळा बाजार येथिल ‘ग्लँडर्स’बाधित घोड्याला ठार मारण्यात आले. त्याचप्रमाणे यासंसर्गाची लागण झालेल्या मानवालाही वेदनारहित मृत्यू देण्याशिवाय पर्याय नाही. ‘ग्लँडर्स’बाधित माणसांनाही मरणच द्यावे लागेल. मात्र, तसा प्रकार अद्याप भारतात झाला नसल्याचा दावा पशूवैद्यकतज्ज्ञ आणि पशूसंवर्धन विभागाने केला आहे. मानवांमध्ये हा आजार दुर्लभ असला तरी त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्याचा संसर्ग होऊ नये, यासाठी संक्रमिताला ठार मारण्याशिवाय पर्याय नाही, यावर मात्र तज्ज्ञांचे एकमत आहे. ‘ग्लँडर्स’चा संसर्ग इतक्या झपाट्याने पसरतो की बाधित मनुष्यप्राण्यावर उपचार करण्याऐवजी त्याला वेदनारहित मृत्यू देऊनच या रोगाला अटकाव घालता येऊ शकतो. असा कायदा सन १८९९ पासून भारतात अस्तिवात आहे. ‘ग्लँडर्स’ याप्राणघातक संसर्गाची लागण झालेल्या अडुळा बाजार येथिल एका घोड्याला ठार मारण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व अश्ववर्गिय जनावरांच्या रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश पशूसंवर्धन विभागाने दिले आहेत.
‘ग्लँडर्स’या जीवाणूजन्य आजाराचा फैलाव अत्यंत वेगाने होतो. त्यामुळे तज्ञांच्या मते बाधितांवर उपचारापेक्षा त्याचा फैलाव रोखण्यास प्राधान्य दिले जाते. ‘ग्लँडर्स’वर परिणामकारक लस वा औषधी उपलब्ध नाही. बाधित प्राण्याच्या संपर्कात येणाºयास हा आजार संभवतो.
- सुधीर गावंडे,
पशूशल्यचिकित्सक
‘ग्लँडर्स’मानवासाठी घातक असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अश्ववर्गिय जनावरांच्या वाहतुकीस मनाई केली आहे. अडुळा बाजारच्या‘ग्लँडर्स’ बाधित घोड्याला ३० जुलैला वेदनारहित मृत्यू देण्यात आला. संसर्ग रोखण्यासाठी अन्य पर्याय नसल्याने शासनही परवानगी देते.
- डॉ. मोहन गोहत्रे, उपायुक्त ,
जिल्हा पशुसंवर्धन विभाग
‘ग्लँडर्स’बाधित मनुष्यात आढळणारी लक्षणे
रक्तप्रवाहात संक्रमण, जुनाट पुरळातून संक्रमण, ताप, स्रायू वेदना, छाती दुखणे, स्रायू तणाव, डोकेदुखी, अतीजोरदार प्रकाश संवेदनशिलता, अतिसार, त्वचा संक्रमण, फुफ्फुसाचा संसर्ग, रक्त संक्रमण, त्वचेची विकृती, यकृताला फोडे, त्वचा व्रण, त्वचा जळू लागणे, अंगावर गाठी येणे.
नवरदेवांनो सावधान !
अडुळाबाजार येथिल ‘ग्लँडर्स’बाधित घोड्याला ठार मारण्यात आल्यानंतर त्याचा मानवालाही धोका होऊ शकतो,यासाठी अश्ववर्गिय जनावरांची रक्तजलनमुने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी घोडे,गाढव आणि खेचरांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात लग्नाच्या वेळी नवरदेवाची घोड्यावरुन वरात काढली जाते.याशिवाय अंजनगावसह अन्य काही गावांमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी घोडागाडी वापरली जाते. त्यामुळे लग्नप्रसंगी नवरदेव आणि घोडागाडीतून प्रवास करणाºयांना ‘ग्लँडर्स’चा संसर्ग होण्याची शक्यता आहे.