जगात केवळ दोनच धर्म!
By Admin | Published: January 10, 2016 12:22 AM2016-01-10T00:22:56+5:302016-01-10T00:24:07+5:30
अमरावती : हिंदू धर्म हा शब्दच मुळातच चूक आहे. सिंधूच्या पलीकडे राहणारे हिंदू, अशी संकल्पना इराणी सत्ताधीशांनी मांडली होती.
पुरूषोत्तम नागपुरे : पहिल्या संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन
अमरावती : हिंदू धर्म हा शब्दच मुळातच चूक आहे. सिंधूच्या पलीकडे राहणारे हिंदू, अशी संकल्पना इराणी सत्ताधीशांनी मांडली होती. जगात केवळ दोनच धर्म आहेत, ते म्हणजे ईहवादी आणि परवादी. या दोन धर्मांशिवाय सर्वधर्मसमभाव होऊ शकत नाही. होऊ शकते ते सर्वधर्म सामंजस्य, असे ज्वलंत प्रतिपादन अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळाचे अध्यक्ष पुरूषोत्तम नागपुरे यांनी येथे केले.
संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात शनिवारपासून सुरू झालेल्या अ. भा. सर्व संत साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष अशोक कामत यांच्यासह अन्य प्रभूती उपस्थित होत्या.
संत साहित्य हे वैश्विक साहित्य आहे. संतांनी विश्वाच्या कल्याणाचा विचार दिला. संत साहित्याचे जागतिक स्तरावर अढळस्थान आहे. आज रंजकतेसाठी निर्माण होणारे साहित्य जन्माला घातले जाते. मात्र उद्याची पिढी घडवायची असेल तर साहित्यिकांनी कीर्तन, भजनावरच न थांबता नवसाहित्याचे निर्माण केले पाहिजे. जे हितार्थ आहे ते साहित्य सहित सर्वांचे साधले जाते. त्यामुळे वैयक्तिक अनुभव न लिहिता संताची विचारसरणी अंगिकारून नवसाहित्य निर्मिती करणे, असे आवाहन नागपुरे यांनी केले. पुण्याच्या साहित्य संमेलनावर त्यांनी जोरदार टीका केली. (प्रतिनिधी)
शिकलेला माणूस बलात्कारी झाला
माकडाचा माणूस नव्हे, तर माणसाचे माकड झाले असेच म्हणावे लागेल. शिकलेला माणूस ‘चतरा’ झाला. शिकलेला माणूस बलात्कारी झाला, अशी खंत व्यक्त करीत माणसाचा बाह्यविकास झाला. मात्र आंतरविकास झाला नसल्याचे अरूण शेळके म्हणाले. शिवाजी शिक्षण संस्थेचा प्रमुख म्हणून शिक्षणाने विकृती आली आणि सारी मानवताच अपंग आणि विकृत झाल्याचे आपण अधिकारवाणीने सांगू शकतो, असे शेळके म्हणाले. त्यामुळे हृदयाचा विकास साधायचा असेल तर संत साहित्याशिवाय तरणोपाय नाही, असे शेळकेंनी स्पष्ट केले.
जब्बार पटेलांचे कवितावाचन
हिंगोली येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक जब्बार पटेल यांनी संत नामदेव महाराजांवर कविता सादर करून सभागृहाच्या टाळ्या मिळविल्या. यावेळी स्वागताध्यक्ष देवेंद्र खडसे, उपाध्यक्ष सुभाष सावरकर, माजी मंत्री सुरेंद्र भुयार यांची समयोचित भाषणे झाली.
संत साहित्य संमेलनाची गरज
आज देशात सर्वत्र अशांत वातावरण दिसत असून जगभर आतंकवादाचे थैमान आहे. त्यामुळे जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या संत साहित्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. जगभर संतांनीच मानवी हिताचा विचार समाजाला देणाऱ्या चिरंतन साहित्याची निर्मिती केलेली आहे. त्या साहित्याला देश, कालाच्या मर्यादा नसतात, संतांचे ते विचार वैश्विक असतात. आज संताची, त्यांच्या साहित्याची गरज यापूर्वी कधीही नव्हती इतकी जाणवू लागली आहे. त्यासाठी संत साहित्याच्या निर्मिती कास धरावी लागणार आहे. सर्व संत साहित्य संमेलनाचे हे प्रयोजन असल्याची भूमिका आयोजकांनी मांडली.
ग्रंथदिंडीने सुरूवात
सकाळी १० वाजता पहिल्यावहिल्या सर्व संत साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. उद्घाटकीय कार्यक्रमात विविध पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. सभागृहाबाहेर पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तके खरेदी करण्यासाठीही चांगली गर्दी होती.
संत साहित्य संमेलनात आज काय ?
रविवार १० जानेवारीला सकाळी १०.३० वाजता ‘संत साहित्यदर्शन’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यानंतर दुपारी २.३० वाजता संत साहित्यातून उलगडणारे स्त्रीमनाचे भावविश्व या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये अलका गायकवाड, ज्योती व्यास, स्मिता ठाकरे, नयना कडू, पद्मा सव्वालाखे, लता जावळे यांचा सहभाग राहील. सायंकाळी ५.३० च्या सुमारास सत्यपाल महाराज यांचे प्रबोधन होईल.
अत्यल्प उपस्थिती अन् दर्दी
अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला अत्यल्प उपस्थिती होती. मात्र संत संमेलने गर्दीने नव्हे तर दर्दींच्या उपस्थितीने यशस्वी होत असल्याचे सांगत आयोजकांनी पुढील दोन दिवसांत गर्दी वाढेल, अशी अपेक्षा निवेदनादरम्यान व्यक्त केली. एखाद्या साहित्य सोहळ्याला माणसे किती हे महत्त्वाचे नाही. महत्त्व आहे ते सृजन सोहळ्यातील संदेशाला, असे सुभाष सावरकर यांनी सांगितले.