शहरात रस्त्याकाठी 'ओपन बार' शॉपबाहेर रिचवले जातात पेग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 03:16 PM2023-04-06T15:16:10+5:302023-04-06T15:17:12+5:30
बारबाहेर मिळतो 'चकणा', पाणी न घेता कोरीच घातली जाते घशात
मनीष तसरे
अमरावती : शहराच्या अनेक ठिकाणी मद्यशौकीन रस्त्यावरच दारू पितात. त्याकरिता त्यांना हवे असलेले पदार्थ अगदी वाइन शॉपबाहेरच उपलब्ध होऊन जातात. त्यामुळे शहरात संध्याकाळी अनेक ठिकाणी ओपन बारचे स्वरूप पाहायला मिळते. मात्र, याकडे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग डोळेझाक करीत आहे.
शहरातील अनेक भागात संध्याकाळ झाली की, वाइन बारच्या बाहेरच मद्यशौकिनांची गर्दी होताना पाहायला मिळते. अगदी रस्त्यावरच हे शौकीन कुठलीही पर्वा न करता बाटली रिचवतात. अनेक ठिकाणी या मार्गावरून तरुणी, लहान मुले तसेच महिला जातात. त्यांना असुरक्षितता वाटते. अनेक ठिकाणी शहरातील हातगाड्यांवर मद्यशौकिनांकरिता व्यवस्था करून दिली जाते, शिवाय शहराच्या बाहेर अनेक हॉटेल तसेच ढाब्यांबर विनापरवानगी मद्यविक्री केली जाते. मात्र, याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग डोळेझाक करीत आहे.
शहरातील या मार्गावर ओपन बार
गाडगेनगर ते पंचवटी, कॅम्प परिसर, बडनेरा मार्ग, जुना बायपास मार्गावरील ओपन बारवर सायंकाळी अनेकजण मोकळ्या जागेत किंवा अगदी मद्यविक्री दुकानाच्या बाजूला बाॅटल खाली करतात. अनेकवेळा त्यांच्यात वादसुद्धा होतात.
महिलांना त्रास
अनेकदा मद्यशौकीन अगदी मुख्य रस्त्यावरच मद्य पितात. त्यामुळे महिलांना याचा नाहक त्रास होतो. गाडगेनगर या भागात अनेक तरुणी तसेच महिला आपल्या कामानिमित्त संध्याकाळी बाहेर पडतात. अशावेळी त्यांना असुरक्षितता जाणवते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची डोळेझाक
'परवाना असेल तर दारू' असा फलक अमरावती शहरातील कुठल्याच वाइन शॉपवर आढळून येत नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू पिण्यासाठी परवाना काढला तरी तो दाखविला जात नाही तसेच वाइन शॉपकडून मद्य खरेदीदाराला परवान्याबाबत कधीच विचारणा होत नाही.
व्यावसायिक त्रस्त
शहरातील अनेक बीअर शॉपी मध्यवस्तीत आहेत. अनेेकजण मद्य विकत घेऊन त्याच ठिकाणी पितात. यामुळे इतर व्यावसायिकांना त्रास होतो. अनेकांनी तर ‘या ठिकाणी दारू पिण्यास मनाई आहे’ असे फलकसुद्धा लावले आहेत. मात्र त्याचा काही फायदा झालेला नाही.
शहरात प्रतिबंधित वा खुल्या जागेवर मद्यसेवन करणाऱ्यांवर मागील महिन्यात एकही कारवाई करण्यात आलेली नाही, शिवाय कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
- अरविंद गभने, निरीक्षक, राज्य उत्पादन शुुल्क विभाग