अमरावती आॅफिसर्स क्लबमध्ये ‘ओपन ग्रीनरी जिम’
By admin | Published: December 2, 2015 12:05 AM2015-12-02T00:05:25+5:302015-12-02T00:05:25+5:30
संगणकीय युगात ‘अॅक्टिव्ह’ राहण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
विदर्भातील एकमेव खुली व्यायामशाळा : विभागीय आयुक्तांची संकल्पना
अमरावती : संगणकीय युगात ‘अॅक्टिव्ह’ राहण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. नियमित व्यायामामुळे आजारांचे प्रमाण कमी होते. म्हणून व्यस्त दिनचर्येतही सुदृढ राहण्यासाठी रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे दिवसभर ताजेतवाने वाटतेच पण सौंदर्यातही मोलाची भर पडते. हीच बाब हेरून पाच जिल्ह्यांच्या मोठा पसारा सांभाळणाऱ्या विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या संकल्पनेतून कांतानगर परिसरातील अमरावती आॅफिसर्स क्लबच्या आवारात ओपन जीम साकारण्यात आला आहे.
या जीमच्या परिसराच्या आसपास विस्तीर्ण हिरवळ आणि चिंचेची झाडे आहेत. या ‘ओपन ग्रीनरी जिम’कडे अल्पावधीतच अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक आकृष्ट झाले आहेत. ओपन जीममध्ये व्यायाम अािण कसरतीसाठी विविध संयंत्रे लावण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांसोबत सर्वसामान्यांचे आरोग्य निरामय राहावे, या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम विभागीय आयुक्तांनी हाती घेतला आहे. विदर्भातील या ‘ओपन जीम’मध्ये अधिकाऱ्यांनाही आरोग्यमंत्र मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
काय आहे ‘ओपन ग्रीनरी जिम’?
विस्तीर्ण क्षेत्रात वसलेल्या आॅफिसर्स क्लबच्या सुमारे चार हजार चौरस फूट खुल्या जागेमध्ये ‘ओपन ग्रीनरी जीम’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. अधिकारी, त्यांचे कुटुंब आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी हा ज्ीाम खुल्या हिरव्यागार जागेत आणि चिंचेच्या शीतल छायेखाली उभारण्यात आला आहे.
विविध संयंत्रांची मांडणी
अमरावती : ‘ओपन ग्रिनरी जीम’मध्ये शोल्डर बिल्डर, लोअर बॅक, चेस्ट प्रेस, सिटेडपुलर, स्टँन्डिंग टिष्ट्वस्टर, स्कायवॉक, सिटअप बेंच आदी महागडी संयंत्रे ठेवण्यात आली आहेत. यात विविध व्यायाम केले जातात. यातील चेस्ट प्रेसने छाती आणि खांद्याच्या स्नायुंचा उत्तम व्यायाम होतो. याशिवाय सिटेडपुलरने खांदेदुखी आणि हातांच्या स्नायुंना आराम मिळतो. मोठ्यांप्रमाणेच लहानग्यांच्या आरोग्याकडे देखील या ओपन ग्रिनरी जीममध्ये लक्ष देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी घसरगुंडी, सी-सॉ, डबलबार लावण्यात आले आहे. सुमारे ६.५० लाख रुपये खर्च करुन आॅफीसर्स क्लबने अमरावतीकरांसाठी हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
विभागीय आयुक्त एकदा पुण्याकडे जात असताना एक ‘ओपन जीम’ त्यांच्या दृष्टीस पडला आणि आॅफीसर्स क्लबच्या विस्तीर्ण खुल्या जागेत ‘ओपन जीम’ ची संकल्पना प्रत्यक्षात आकाराला आली. १८६८ साली स्थापन झालेल्या आॅफीसर्स क्लबच्या सौंदर्यात या ओपन जीमने अधिकच भर घातली आहे. परिसरातील नागरिक दररोज या ओपन जिममध्ये येवून व्यायाम आणि कसरतीचे धडे गिरवत आहेत. (प्रतिनिधी)
काय आहे आॅफिसर्स क्लब ?
सन १८६८ साली स्थापन झालेल्या आॅफीसर्स क्लबमध्ये तूर्तास ३५० अधिकारी सदस्य आहेत. यात काही खासगी व्यक्तिंचाही समावेश आहे. विभागीय आयुक्तालयासमोर असलेल्या कांतानगरस्थित या आॅफीसर्स क्लबमध्ये बिलियर्ड रुम, लॉन टेनिस, स्विमिंग, ५०० मीटरचा वॉकिंग ट्रॅक याशिवाय डान्सिंग फ्लोअर सुध्दा आहे. विभागीय आयुक्त अमरावती आॅफीसर्स क्लबचे अध्यक्ष असून जिल्हाधिकारी किरण गित्ते उपाध्यक्ष व अजय लहाने सचिव आहेत. अंकुश डहाके यांच्याकडे या क्लबच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.
सर्वांसाठी खुला
लाखों रूपयांची व्यायाम संयंत्रे येथे बसविण्यात आली असून हा ‘ओपन ग्रीनरी जीम’ सर्वांसाठी खुला आहे. सध्या या भागात राहणारे अधिकारी, त्यांचे कुटुंबिय आणि परिसरातील नागरिक येथे व्यायाम अािण कसरतीचे धडे घेत आहेत.
सामाजिक आरोग्य अबाधित राहावे आणि समाजाचेही आपण काही देणे लागतो, या उद्देशातून हा ‘ओपन जीम’ साकारण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनीही लाभ घ्यावा.
- ज्ञानेश्वर राजूरकर,
विभागीय आयुक्त, अमरावती.