आॅनलाईन प्रवेशासाठी लिंकच उघडेना !
By admin | Published: February 8, 2017 12:26 AM2017-02-08T00:26:42+5:302017-02-08T00:26:42+5:30
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यानुसार २५ टक्के प्रवेश आॅनलाईन पद्धतीने देण्याची प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.
पालक त्रस्त : प्राथमिक शिक्षण प्रक्रिया
अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यानुसार २५ टक्के प्रवेश आॅनलाईन पद्धतीने देण्याची प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. रविवारपासून आॅनलाईवर प्रवेश अर्ज निश्चित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु आॅनलाईन प्रवेशाची माहिती भरण्यासाठी शिक्षण विभागाने दिलेली लिंकच उघडत नसल्यामुळे पालकांसमोर अडचण निर्माण होत आहे. लिंक उघडत नसल्याने पालक त्रस्त झाले आहेत. शिक्षण विभागाने पालकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
अनुसूचित जाती, जमाती आर्थिकदृष्ट्या मागास, दिव्यांग या वर्गवारीनुसार चालू वर्षात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत प्रवेश दिले जाणार आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना २५ टक्के प्रवेशासाठी शाळांची नोंदणी करण्याचे बजावण्यात आले. त्यासाठी दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील पात्र शाळांपैकी काही शाळांनी नोंदणी केली आहे. उर्वरित शाळांची नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. ५ फेब्रुवारीपासून ते २१ फेब्रुवारीपर्यंत पालकांना आपल्या पाल्यांच्या प्रवेश निश्चितीसाठी आॅनलाईन माहिती भरण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. आपल्या पाल्याला नामांकित आणि दर्जेदार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी पालक धडपड करीत आहेत. ५ फेब्रुवारीपासूनच पालकांनी शिक्षण विभागाने दिलेली 'एज्युकेशन महाराष्ट्र जीओजी.इन' या वेबसाईटवर जाऊन पाल्यांची प्रवेशासंबंधीची माहिती भरण्याचा जिकरीचे प्रयत्न करीत आहेत.परंतु लिंकच उघडत नसल्यामुळे पालकांची पंचाईत झाली आहे. त्रस्त झालेल्या पालकांनी शिक्षण विभागाकडून ही लिंक सुरू करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
पालकांची नाराजी
हल्ली कामाची व्यस्तता पाहता आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी वेळेतून वेळ काढून संकेतस्थळावर फॉर्म भरण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र लिंक उघडत नसल्यामुळे त्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यांची नाराजी आहे.