शहरात खुलेआम थाटली पेट्रोल विक्रीची दुकाने !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 10:45 AM2024-11-27T10:45:28+5:302024-11-27T10:46:19+5:30
Amravati : धक्कादायक ! कडक निर्बंध धाब्यावर, काही भागात सर्रास विक्री
मनीष तसरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एरवी कितीही अडचण असली तरी पेट्रोल पंपांवर बॉटलमध्ये पेट्रोल देण्यावर बंदी घालणाऱ्या पुरवठा विभागाचे शहरात खुलेआम होत असलेल्या पेट्रोल विक्रीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
शासनाच्या कडक निर्बंधानंतरसुद्धा शहरातील काही भागात सर्रासपणे पेट्रोल विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. पेट्रोल पंपावर बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास बंदी घातली असली तरी या आदेशाला पायदळी तुडविले जात आहे. यामुळे पुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
काही वर्षांपूर्वी एका युवतीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. या घटनेने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थाचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो, याचा साक्षात्कार झाला होता. या घटनेनंतर प्रशासनाने ठोस पावले उचलली होती. मात्र, अलीकडे पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल मिळत नसले तरी शहरातील काही भागात जणू खुले पेट्रोलविक्रीचे दुकानेच थाटलेली आहेत. पुरवठा विभाग मात्र मूग गिळून आहे.
शासनाचे निर्बंध, कारवाईकडे दुर्लक्ष
पंपावर बाटलीतून पेट्रोल देण्यास शासनाने निर्बंध लावले आहेत. या यंदीमुळे अनेक पेट्रोल पंप संचालकांनी बाटलीतून पेट्रोल विक्रीवर बंदी घातली आहे. तरीसुद्धा शासनाचे नियम धाब्यावर बसवून शहरात काही ठिकाणी चक्क दुकान थाटून खुले पेट्रोल विक्री केली जात असल्याचे दिसून आले.
जिवाचा धोका पत्करून व्यवसाय
अवैध पेट्रोल विक्री करून काहींना रोजगार मिळून नफा मिळत असला तरी यामुळे होणारा धोका हा मोठा आहे. पेट्रोलसारखा ज्वलनशील पदार्थ विनापरवानगी विक्री करणे, हे कायद्याने गुन्हा नाही तर इतरांच्या जिवाशी खेळ ठरू शकतो. अगदी रस्त्यावर दुकान मांडून विक्री करणाऱ्या पेट्रोलमुळे केव्हाही आग, स्फोट किंवा इतर आपत्तीला जणू निमंत्रणच दिले जात आहे.
पुरवठा विभागाला हवी तक्रार
ज्वलनशील पदार्थ विक्रीवर बंदी असताना शहरात पेट्रोल हे खुलेआम विक्री होत आहे. शहरातील काही ठिकाणी अगदी रस्त्यावरच ते विक्री केले जात आहे. मात्र, शहरात होणाऱ्या या खुल्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी पुरवठा विभागाला तक्रार हवी.
"बाटलीतून पेट्रोलला बंदी पेट्रोल पंपावर बाटलीतून पेट्रोल विक्रीकरिता बंदी आहे. शेतकऱ्यांना शेती कामाकरिता डिझेल बाटलीमध्ये दिले जाते. शहरात खुले पेट्रोल कुठे विकले जात असल्यास लोकांनी तक्रार करावी. सेल्स ऑफिसरला कळविले जाईल."
- निनाद लांडे, पुरवठा अधिकारी