राज्यात मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:41 AM2020-06-10T11:41:05+5:302020-06-10T11:44:43+5:30
यंदा २३ मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे मार्च महिन्यातील मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा रखडल्या.
गणेश वासनिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा ‘लॉकडाऊन’मुळे रखडली आहे. सातही विभागीय केंद्रांवर अंतिम वर्षाची परीक्षा न झाल्याने पदव्युत्तर प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना चिंता लागली आहे. शासनस्तरावरून परीक्षेसंदर्भात अद्यापही निर्णय झाला नाही.
शिक्षणाची गंगाजळी प्रत्येक दारापर्यंत पोहचवण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. मात्र, यंदा २३ मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे मार्च महिन्यातील मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा रखडल्या. परीक्षा केव्हा, कधी होणार, याबाबत शासननिर्णयाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. मुक्त विद्यापीठाच्या सातही केंद्रांवर परीक्षा घेण्यासंदर्भात तयारी आहे. मात्र, परीक्षांचे नियोजन कसे असावे, यासंदर्भात शासनाकडून गाईड लाईन प्राप्त झाल्या नाहीत. विद्यापीठाने ऑफलाईन, ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे परीक्षा घेण्याची तयारी चालविली आहे. प्रथम किंवा द्वितीय वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा मागे-पुढे घेता येतील. केवळ अंतिम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षांची नियमावली शासनाने स्पष्ट न केल्याने त्यांची परीक्षा रखडली आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, नाशिक व अमरावती या सातही अभ्यास केंद्रांतून अंतिम वर्षाला १.८० लाख विद्यार्थी प्रवेशित असल्याची माहिती आहे.
लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शैक्षणिक सत्र
मुक्त विद्यापीठाच्या सातही विभागीय केंद्रांवर लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शैक्षणिक सत्र राबविण्यात आले. साडे आठ हजार विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन शैक्षणिक सत्राचा लाभ घेतला आहे. एकट्या अमरावती येथील विभागीय अभ्यास केंद्रावरून ३९५३ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शैक्षणिक सत्रात सहभाग घेतला.
परीक्षेसंदर्भात एसएमएसने कळविणार
मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात किमान १५ दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना कळविले जाणार आहे. परीक्षेची पद्धत, स्वरूप, तारीख आदी माहिती एसएमएसद्वारे कळविण्याची तयारी असल्याचे मुक्त विद्यापीठाच्या अमरावती विभागीय अभ्यास केंद्राचे संचालक अंबादास मोहिते यांनी ‘लोकमत’ला सांगितले.