नळ-दमयंतीच्या महापुराने नागरिक उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 01:35 AM2019-09-06T01:35:44+5:302019-09-06T01:36:30+5:30
पेठपुरा भागातील अनेक घरात सहा ते सात फूट पाणी साचल्याने संसारपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले. सुमारे ५०० ते ६०० घरांमध्ये पाणी शिरले. अनेक पाळीव जनावरे वाहून गेली. सर्वेक्षणानंतर नुकसानाचा नेमका आकडा कळू शकणार आहे.
अजय पाटील/गोपाल डहाके।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या दमयंती नदीला बुधवारी आलेल्या महापुरामुळे येथील आठवडी बाजार, मालवीयपुरा, मांगपुरा, भंगीपुरा, भोईपुरा, खोलवाट, पेठपुरा, गधेघाटपुरा आदी भागात पाणी शिरल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रतिकुटुंब एक लाख रुपयांची मदत देण्याची मागणी पूरग्रस्त करीत आहेत.
पेठपुरा भागातील अनेक घरात सहा ते सात फूट पाणी साचल्याने संसारपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले. सुमारे ५०० ते ६०० घरांमध्ये पाणी शिरले. अनेक पाळीव जनावरे वाहून गेली. सर्वेक्षणानंतर नुकसानाचा नेमका आकडा कळू शकणार आहे. तथापि, प्रथमदर्शनी २५०० ते ३००० नागरिकांना महापुराचा झटका बसला. इलेक्ट्रिक डीबी, पोल व विद्युत वाहिनी पाण्याखाली आल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणनेही खबरदारी म्हणून पाणी शिरलेल्या सहा ते सात वस्त्यांसह अन्य ठिकाणची वीज खंडित केली.
तहसीलदार गणेश माळी यांनी महापुराच्या नुकसानाला स्थानिक नगरपालिकेला जबाबदार ठरविले. दुसरीकडे दमयंती नदीला आलेला पूर वाढत असताना अप्पर वर्धा प्रक ल्पाची दारे उघडण्यास हवी होती. मात्र, तसे न झाल्याने महापुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचा आरोप होत आहे. शहरातील काही जाणकारांच्या मते, सन १९६५ मध्ये असाच महापूर आला होता. त्यानंतर सन १९८४ मध्ये आलेल्या महापुरात मोर्शी शहरात अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. त्यावेळी प्रशासनाने दमयंती नदीकाठी असलेल्या घरांचे पाण्याच्या टाकीजवळ पुनर्वसन केले होते. शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे ५०० कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
महसूल, नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण
मोर्शी व वरूड येथील महसूल विभागाने वेगवेगळी पथके करून कॉलनी परिसर व अन्य पूरग्रस्त परिसराचा दौरा केला. काही घरांमध्ये गुरुवारीही पाच ते सहा फूट पाणी साचले होते. अनेकांचे धान्य, टीव्ही, फ्रीज, कूलर, पुस्तके, दप्तर, भांडीकुंडी खराब झाले. काही घरातील साहित्य पुरासोबत वाहून गेले. वरुडचे नायब तहसीलदार एल.एस. तिवारी, मंडल अधिकारी प्रमोद राऊत, तलाठी प्रमोद सोळंकी, अनिल खेरडे, नीलेश ठाकरे, मोर्शी पालिकेचे कर्मचारी नाना ऊर्फ राहुल देशमुख, रोशन गाडे हे कर्मचारी सहभागी झ्राले.
मंडळाचे पेंडॉल गणेशमूर्तीसह वाहून गेले
बुधवारी दुपारी अचानक आलेल्या दमयंती नदीच्या पुरामुळे पेठपुरा भागातील मित्र गणेश मंडळ व समता गणेश मंडळ या दोन मंडळांनी उभारलेला सभामंडप गणेशमूर्तीसह वाहून गेला. पेठपुरा भागातील ऋषीकेश अमझरे या युवकाची एमएच २७ सीजे ७५३० क्रमांकाची नवीन दुचाकी घरापासून सुमारे एक हजार फुटांवर अडकून पडली, तर ट्रॅक्टर पाण्याच्या जोरदार प्रवाहात कलंडला.
जिल्हाधिकारी, कृ षिमंत्र्यांकडून पाहणी
पालकमंत्री तथा कृषिमंत्री अनिल बोंडे आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शहरातील पूरग्रस्त कुटुंबीयांना १५ हजार रुपये, तर ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना दहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केली आहे. पूरग्रस्तांचे तातडीने सर्वेक्षण करण्याकरिता महसूल विभागाच्यावतीने २३ पथके तैनात करण्यात आलेली आहे. पूरग्रस्त कुटुंबीयांचे सर्वेक्षण झाल्यानंतर लाभार्थी कुटुंबाला मदत दिली जाणार आहे, अशीही कृषिमंत्री बोंडे यांनी सांगितले.
एकवीरा स्कूलच्या विद्यार्थ्यांची सुटका
पावसामुळे मोर्शी-चांदूर बाजार महामार्ग बंद झाल्यामुळे या मार्गावरील एकवीरा स्कूल आॅफ ब्रिलियंट्सचे ४० विद्यार्थी अडकून पडले होते. ते विद्यार्थी व त्यांचे पालक भयभीत झाले होते. शिक्षकांनी अमरावती-नरखेड रेल्वे मार्गाने त्या विद्यार्थ्यांना मणिमपूर या गावापर्यंत चालत आणत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
नळाने रोखले दमयंतीला
शहराच्या एका टोकाला नळा नदी, तर शहराच्या मध्यभागातून दमयंती नदी वाहते. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नळा नदीला आधी पूर आला. त्यानंतर दमयंती नदीला आलेला पूर नळा नदीने रोखल्यामुळे मोर्शी शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. दमयंती नदी शहराच्या मध्यभागातून वाहत असल्यामुळे पुराच्या पाण्याचा अनेक घरांना वेढा दिला. यामुळे अनेक घरांचे अतोनात नुकसान झाले आहे.