ऑपरेशन ऑलआऊट; २४५ पोलीस उतरले रस्त्यावर; गुन्हेगारीवर वचक
By प्रदीप भाकरे | Published: October 14, 2024 04:43 PM2024-10-14T16:43:22+5:302024-10-14T16:45:25+5:30
तडीपारांवर कारवाई : वाहनचालकांना दंड, वान्टेड आरोपींना पकडले
अमरावती : आगामी नवदुर्गा विसर्जन व सण उत्सव अनुषंगाने गुन्हेगारांवर वचक निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह मालमत्तेच्या गुन्हयांवर अंकुश लावण्याकरीता जिल्हयात ११ ऑक्टोबर रोजी रात्री १ ते सकाळी पाचपर्यंत ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. यात पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, पोलीस उप अधिक्षक, ठाणेदार असे एकूण ४४ पोलीस अधिकारी व २०१ पोलीस अंमलदार सहभागी झाले.
या मोहिमेदरम्यान महत्वाचे रस्त्यांवर, जिल्हयाचे, राज्य सिमेवर सशस्त्र नाकाबंदी नेमून वाहने व सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. गुन्हेगारांची आश्रयस्थाने, तडीपार आरोपी, पकड वॉरंटमधील आरोपींची तपासणी करण्यात आली. ग्रामीण हद्दीतील धाबे, हॉटेल, लॉजेसची चौकशी करण्यात आली आहे. रेकॉर्डवरील ‘पाहिजे’ म्हणून घोषित असलेल्या विक्की मधुकर घोडेस्वार (रा. मांजरखेड, ता. चांदुर रेल्वे) यास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. येवदा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अब्दुल अकील अब्दुल वहिद (वय ३० वर्ष, रा. येवदा) याच्याविरुध्द शस्त्र अधिनियमान्वये कार्यवाही केली. गोपाल लोंडे (४५, वरुड), प्रमोद धाकतोडे (२५, येवदा), आकाश डोईफोडे (२४, परतवाडा) या तिघांवर गुन्हा करण्याच्या तयारीने फिरत असल्याचा संशय निर्माण झाल्याने त्यांचेविरुध्द एलसीबीकडून कारवाई करण्यात आली.
पकड वारंटमधील सात पकडले
पकड वॉरंटमधील एकुण सात आरोपींना अटक करण्यात आली. १२ जमानती वॉरंट व ९ समंन्स बजावणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान ५४ वाहनांवर कार्यवाही करण्यात आली.अवैध दारुविरुध्द एकुण आठ केसेस करुन २४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोर्शी, शिरजगाव कसबा व स्थानिक गुन्हे शाखा मिळून रेती चोरी कारवाईच्या तीन कारवाईत १६ लाख २० हजारांचा तर, येवदा येथे गोवंशांच्या एका कारवाईत ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
"अचानकपणे सुरू करण्यात आलेल्या या ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेमुळे समाजकंटक व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर चांगलाच वचक बसला आहे. अशा प्रकारच्या मोहीम सतत राबविण्यात येणार आहेत."
- विशाल आनंद, पोलीस अधीक्षक, अमरावती