आॅपरेशन मुस्कान : १३ बालकांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:41 AM2018-12-10T00:41:29+5:302018-12-10T00:42:02+5:30
आॅपरेशन मुस्कान अंतर्गत मुलामुलींच्या शोधमोहिमेत शहर पोलिसांनी १३ बालकांचा, तर ग्रामीण हद्दीत दोन बालकांचा शोध घेतला आहे. त्यापैकी काही बालकांना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले, तर काही बालकांना बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आॅपरेशन मुस्कान अंतर्गत मुलामुलींच्या शोधमोहिमेत शहर पोलिसांनी १३ बालकांचा, तर ग्रामीण हद्दीत दोन बालकांचा शोध घेतला आहे. त्यापैकी काही बालकांना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले, तर काही बालकांना बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आले.
जिल्ह्यातील ५४ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता आहेत. पोलिसांनी आॅपरेशन मुस्कान मोहीम राबवून त्यांचा शोध घेतला. शहर व ग्रामीण अशा एकूण ४१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बेपत्ता, हरविलेल्या व अपहृत मुला-मुलींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. प्रत्येक ठाण्यातील एक पोलीस अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून अल्पवयीन मुलामुलींची शोधमोहीम सुरू आहे. शहर पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी भटकणाºया १३ मुलांची चौकशी केली. त्यात दोन मुली आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असल्याचे निदर्शनास आल्या. त्या दोघींना समुपदेशनानंतर आर्वी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याशिवाय ११ बालकामगार आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीकडे सोपविले आहे.
ग्रामीण हद्दीतील पोलिसांनीही दोन बालकांचा शोध घेतल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, त्यांच्याविषयी माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. पोलीस विभागाकडून १ ते ३१ डिसेंबर दरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे. सन २०१७ व २०१८ दरम्यान दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यांपैकी १८ मुली व पाच मुले अद्याप गवसली नाहीत. या सर्व मुलामुलींचा शोध घेतला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके व शहर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात महिला सेलच्या पोलीस निरीक्षक नीलिमा आरज व पोलीस उपनिरीक्षक प्रशाली काळे मुला-मुलींचा शोध घेत आहेत.