डेप्युटी सीईओंच्या दालनात विरोधकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2016 12:10 AM2016-01-13T00:10:35+5:302016-01-13T00:10:35+5:30
जिल्हा परिषदेमधील रिक्त असलेल्या विषय समितीमधील पदे भरण्यासाठी १२ जानेवारी रोजी बोलविण्यात आलेल्या सभेत नामाकंन अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आली नाही.
जिल्हा परिषद : विषय समितीचा वाद, सदस्य आक्रमक
अमरावती : जिल्हा परिषदेमधील रिक्त असलेल्या विषय समितीमधील पदे भरण्यासाठी १२ जानेवारी रोजी बोलविण्यात आलेल्या सभेत नामाकंन अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आली नाही. या विरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करीत लेखी उत्तराची मागणी रेटून धरली.
जिल्हा परिषद अध्यक्षांनी मंगळवारी जिल्हा परिषदेतील विषय समितीमध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी सभा बोलविली होती. मात्र या सभेत २९ मे रोजीच्या सभेतील विषय सूचीनुसार सदस्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात येईल असे नमूद आहे. परंतु १२ जानेवारीला झालेल्या सभेबाबतच्या नोटीसमध्ये प्रशासन व अध्यक्षांकडून ही चूक हेतुपुरस्पर करण्यात आली असल्याने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे, माजी सभापती मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने आदींनी सभेपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील यांच्याकडे लेखी स्वरूपात पत्र दिले होते. या पत्रानुसार सुरेखा ठाकरे, मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने आदींचे दोन समितीमध्ये अर्ज आहेत. परंतु कलम १८(१) च्या तरतूदी नुसार आम्हाला एकाच समितीवर निवडून जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही एका समितीवर अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात यावा व त्यानंतरच पुढील प्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली होती. याबाबत जाब विचारण्यासाठी सुरेखा ठाकरे, मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने, आदीसह सुधिर सूर्यवंशी, अभिजित ढेपे, प्रमोद वाकोडे,प्रवीण मुंदडा, सदाशिव खडके, जया बुंदिले, कविता दामेधर, अर्चना मुरूमकर, प्रेमा खलोकार आदींनी ठिय्या दिला होता. मात्र सभेची नसती प्रशासनाला अप्राप्त असल्याने आपण यावर प्रशासनाच्यावतीने मत मांडू शकत नसल्याचे डेप्युटी सीईओंनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)