-तर पुरून ऊरू!
By admin | Published: February 21, 2016 12:10 AM2016-02-21T00:10:40+5:302016-02-21T00:10:40+5:30
प्रस्तावित उड्डाण पूल रद्द करून त्याऐवजी शेंदोळा ते तळेगाव ठाकूर हा वळणमार्ग तयार करण्याची घोषणा स्वागतार्ह आहे;
पत्रपरिषद : दिनेश सूर्यवंशी यांचा इशारा
अमरावती : प्रस्तावित उड्डाण पूल रद्द करून त्याऐवजी शेंदोळा ते तळेगाव ठाकूर हा वळणमार्ग तयार करण्याची घोषणा स्वागतार्ह आहे; पण जर कोणी विरोधासाठी विरोध करीत असेल तर आम्ही त्यांना पुरून ऊरू, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) दिनेश सूर्यवंशी यांनी पत्रपरिषदेत दिला.
अमरावती भाजपाच्यावतीने या निर्णयाचे स्वागत केले असून २०१२ मध्ये जेव्हा हा उड्डाण पूल प्रस्तावित झाला तेव्हापासून गुरुदेव सेवा मंडळाचा याला विरोध होता. आमचा नेहमीच त्यांच्या विचाराला पाठिंबा राहिला आहे. गुरूदेव सेवा मंडळाच्या गुरूदेव भक्तांचे व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे प्रेरणास्थान असल्यामुळे वळणमार्ग तयार करण्यास कुठलीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास तसेच जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळासमोरील प्रस्तावित उड्डाण पूल रद्द करून त्याऐवजी शेंदोळा ते तळेगाव ठाकूर हा बायपास तयार करण्याची घोषणा शुक्रवारी केली होती. दिनेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत ना. गडकरी यांना वळणमार्गाचे प्रेझेन्टेशन देण्यात आले. ते पटल्यामुळे गडकरींनी त्याला मंजुरी दिली.
अमरावती जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने १८७ रस्त्यांच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मागितलेले ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. तो जनतेच्या हिताच्या विरोधातील असून काँग्रेसची जनविरोधी भूमिका आहे, असा आरोप सूर्यवंशी यांनी केला. भारतीय जनता पार्टीतर्फे २२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान जनस्वाभिमान सप्ताह साजरा केला जाईल.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राष्ट्रविरोधी नारे देवून भारताचे तुकडे करण्याची भाषा बोलणाऱ्या राष्ट्रविरोधी तत्त्वांना विरोध करण्यासाठी सभा, मेळावे घेण्यात येतील, अशीही माहिती सूर्यवंशी यांनी दिली.