अवकाळी पाऊस आणि दमट हवामानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 08:24 PM2021-04-24T20:24:43+5:302021-04-24T20:25:05+5:30
Amravati news oranges यंदाच्या बदललेल्या वातावरणामुळे संत्र्याच्या आंबिया बहराच्या फळगळीमध्ये वाढ झाली आहे. नैसर्गिकपणे होणाऱ्या १५ टक्क्यांपेक्षा ही गळती अधिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदाच्या बदललेल्या वातावरणामुळे संत्र्याच्या आंबिया बहराच्या फळगळीमध्ये वाढ झाली आहे. नैसर्गिकपणे होणाऱ्या १५ टक्क्यांपेक्षा ही गळती अधिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
संत्र्याला एप्रिल महिन्यात आंबिया बहर येतो. मात्र, या महिन्यात झालेला पाऊस, दमट वातावरण, दिवसा आणि रात्रीच्या तामपानातील तफावत यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. विदर्भात प्रामुख्याने नागपूर आणि अमरावती महसूल विभागात या फळपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. संत्र्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असून, वातावरणातील हजारो टन कार्बन डॉय ऑक्साईड शोषून घेऊन पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होत आहे.
काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे फळाची वाढ खुंटली व गळती वाढली आहे. दमट आणि उष्ण वातावरणामुळे फळाच्या देठाजवळ बुरशीचा प्रादुर्भाव झाला असून, काही संप्रेरक व अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळगळीचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. हे रोखण्यासाठी कृषी विभागाने उपाय सुचविले आहेत.
अशी करा उपाययोजना
संत्राबागेला झाडाच्या वाढीप्रमाणे आवश्यकतेनुसार ठिबक संचाने (डबल लाईन) दररोज पाणी द्या. सेंद्रिय व जैविक खते वर्षातून तीनदा आणि फळवाढीच्या अवस्थेत पाण्यात विरघळणारी रासायनिक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य खते महिन्यातून दोन ते तीन वेळा द्यावीत. फळे तोडल्यानंतर ताबडतोब वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्या आणि त्यावर कार्बंडीझम एक टक्के किंवा कॉपर ऑक्सि क्लोराईडची फवारणी केल्यास फळगळ कमी होते. फळगळ कमी करण्याकरिता २,४-डी किंवा जी.ए. (जिब्रेलिक आम्ल ) १.५ ग्रॅम अधिक रोको १०० ग्रॅम किंवा नेटिवो ७० ग्रॅम अधिक १९:१९:१९-६०० ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्य ५०० ग्रॅम अधिक स्टिकर १०० एमएल यांचे १०० लिटर पाण्यात द्रावण करून फवारणी करावी. १५ दिवसांनी पुन्हा दुसरी फवारणी करावी.
फायटोप्थेरा या बुरशी रोगाची लक्षणे
कृषी सल्ला व सेवा वरिष्ठ व्यवस्थापक गुणवंत डफरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत्राझाडांची पाने शेंड्याकडून पिवळी पडून हळूहळू गळत जातात. खोड व फांदी यातून चिकट द्रव स्रवतो. झाडाच्या मुळांचा रंग तपकिरी व काळा पडून त्याला दुर्गधी येते. ही सर्व लक्षणे फायटोप्थेरा या बुरशी रोगाची आहेत. यासाठी संत्रा बागेचे आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन आवश्यक आहे. गादी वाफ्यावर लागवड करणे, पाट पाणी किंवा आळे पद्धतीने ओलीत न करता पूर्णत: ठिंबक सिंचनाचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
...