संत्रा बहराची फळगळ

By admin | Published: September 11, 2015 12:29 AM2015-09-11T00:29:25+5:302015-09-11T00:29:25+5:30

जिल्ह्यात यंदा सर्वाधिक असलेल्या संत्रा आंबिया बहराच्या अपरिपक्व फळांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.

Orange deafness | संत्रा बहराची फळगळ

संत्रा बहराची फळगळ

Next

उत्पादनात २० टक्क्यांनी कमी : बुरशीचा प्रादुर्भाव, वातावरणाचा बदल कारणीभूत
अमरावती : जिल्ह्यात यंदा सर्वाधिक असलेल्या संत्रा आंबिया बहराच्या अपरिपक्व फळांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. बुरशीजन्य आजार, अन्नद्रव्यांची कमतरता व वातावरणातील बदलांमुळे ही फळगळ होत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले. या फळगळीमुळे संत्र्याच्या सरासरी उत्पादनात किमान २० टक्क्यांनी घट येण्याची शक्यता असून यामुळे संत्रा उत्पादकांना कोट्यवधींचा फटका बसणार आहे.
सद्यस्थितीत दिवसा वातावरणात कमालीची उष्णता जाणवत आहे. अचानक झालेल्या या बदलासोबतच अन्नधान्याची कमतरता व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्र्याची फळगळ होत आहे. बोटिओडिप्लोडिया, कोलीटोट्रिकम व काही अंशी आॅलटरनेरिआ या बुरशीमुळे संत्र्यांची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत आहे. या बुरशी फळांच्या देठांमधून फळांमध्ये प्रवेश करून पूर्ण वाढ झालेल्या फळांचे नुकसान करतात. जुन्या वाळलेल्या फांद्या असतील तर रोग अधिक पसरतो. काळी माशी, मावा-तुडतुडे यांच्या शरीरातून निघालेल्या साखरेसारख्या पदार्थांवर बुरशीची वाढ, पेशीक्षय होऊन फळगळ होत आहे.
संत्र्यामध्ये शेंडेमर रोगाला कारणीभूत असलेल्या बुरशींचा प्रादुर्भाव पावसाळ्यात होतो. याची लक्षणे सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात दिसतात. नंतर या बुरशीचा प्रादुर्भाव संत्र्याचे देठ व सालीच्या जोडावर होऊन तेथे काळपट तपकिरी रंगाचे डाग पडतात. तो भाग कुजून फळांची गळ होते. फायटोप्थेरा या बुरशीच्या प्रादुर्भावामुळेदेखील संत्राफळावर फळकुज्या रोग येतो. जुलै-आॅगस्टमधील सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर हा रोग पसरतो. झाडांच्या जमिनीलगतच्या फांद्यावरील कोवळ्या पानावर प्रथम भुरकट/तांबडे ठिपके पडतात व पानगळ होत आहे.
झाडावरील कोवळ्या फांद्या कुजतात व प्रतिकूल वातावरणात हा रोग लहान फळांवर येऊन फळांवर कुजल्यासारखे डाग पडतात. त्यानंतर फळे गळून पडत असल्याचे प्रादेशिक संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ राजेंद्र वानखडे, योगेश इंगळे व मोहन खाकरे यांनी सांगितले.
या कराव्यात उपाययोजना
अमरावती : झाडांवर भरपूर पालवी राहावी म्हणून अन्नद्रव्यांचा शिफारसीनुसार वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास त्वरित पुरवठा करावा. बागांमधील ओल तुटली असेल तर शेतकऱ्यांनी ओलीत सुरू करावे. पहिले हलके पाणी द्यावे व नंतर वाढवत न्यावे. पाण्याच्या पाळ्या नियमित जमिनीच्या आवश्यकतेप्रमाणे देण्यात याव्यात.
ठिबक सिंचनाद्वारे ओलीत करावयाचे असल्यास दररोज ओलीत करावे. आॅगस्ट सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात एन. ए.ए. १ ग्रॅम (१० पीपीएम) किंवा २, ४-डी १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) + युरिया १ किलो + १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा बेनोमिल १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रसशोषण करणाऱ्या पतंगाच्या नियंत्रणासाठी २५ मि.ली. डायझिनॉन किंवा १० मि.ली. मॅलॉथिआॅन अधिक १०० ग्रॅम गूळ अधिक २५ मि. लि. फळांचा रस (खाली पडलेल्या) किंवा शिरका एक लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले मिश्रण मोठे तोंड असलेल्या डब्यात घेऊन हे डबे अधूनमधून झाडांवर टांगावेत. सायंकाळी बागेत धूर करावा. नर पतंगांना आकर्षित करणारे ०.१ टक्के मिथाईल युजेनॉलचे सापळे एकरी १० या प्रमाणात लावावे. तसेच संत्राबागेत विजेचे दिवे लावावेत. रस शोषण करणारा पतंगाच्या अळ्या गुळवेल व वासनवेल या वेलीवर उपजिविका करीत असल्यामुळे या वेलींचा नायनाट करावा. संत्रा फळांची तोडणी झाल्यानंतर लगेच वाळलेल्या फांद्यांची छाटणी करावी किंवा पावसाळ्यापूर्वी रोगट व वाळलेल्या फांद्या (सल) काढून जाळाव्यात व लगेच झाडावर कार्बेन्डाझिम ०.१ टक्के (१० ग्रॅम १० लिटर पाणी) फवारणी करावी. गळून पडलेली फळे लवकरात लवकर उचलून दूर फेकून द्यावीत किंवा खड्यात पुरवावी. नॅफथॅलीन अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड (एन. ए. ए.) किंवा २, ४-डी पाण्यात पूर्णपणे विरघळत नसल्यामुळे ४०-५० मि. ली. अल्कोहोल किंवा अ‍ॅसिटोनमध्ये विरघळून घ्यावीत, असे कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.

Web Title: Orange deafness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.