निर्यातीमध्ये संत्रा चौथ्या स्थानावर

By Admin | Published: April 5, 2017 12:04 AM2017-04-05T00:04:20+5:302017-04-05T00:04:20+5:30

शासनासह यंत्रणेच्या बेपर्वावृत्तीचा फटका संत्र्याच्या निर्यातीला बसला आहे.

Orange exports in fourth position | निर्यातीमध्ये संत्रा चौथ्या स्थानावर

निर्यातीमध्ये संत्रा चौथ्या स्थानावर

googlenewsNext

यंत्रणेच्या बेपर्वाईचा फटका : फळांमध्ये आंबा, द्राक्षे, केळी आघाडीवर
अमरावती : शासनासह यंत्रणेच्या बेपर्वावृत्तीचा फटका संत्र्याच्या निर्यातीला बसला आहे. मागील चार वर्षांचा आढावा घेता इतर फळांच्या तुलनेत निर्यातीमध्ये संत्रा चौथ्या स्थानावर असल्याचे शासनाचे आर्थिक व्यवहाराच्या अहवालात नमूद आहे. यामध्ये आंबा,द्राक्ष व केळी आघाडीवर आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यातील संत्रा माघारला आहे.
सातासमुद्रापार नागपुरी संत्र्याची ओळख हल्ली कमी होऊ लागली आहे. निर्यात धोरणात अलिकडे झालेल्या बदलानंतर संत्रा उत्पादकांना प्रोत्साहन मिळायला हवे. मात्र, राज्यात संत्र्याचा उतरता प्रवास सुरू आहे. या तुलनेत कोकणातील आंब्याने बाजी मारली आहे. सन २०१६-१७ च्या हंगामात देशातील १२ हजार २९५ टन संत्र्याची निर्यात झाली व ३२ कोटी निर्यातमूल्य मिळाले. यामध्ये राज्यातील २७३ टन संत्र्याचा समावेश आहे. राज्यातील आंब्याला ३०६ कोटी निर्यातमूल्य मिळाले. दुसऱ्या स्थानावर द्राक्ष आहेत. देशातून ६९ हजार ५९९ टन द्राक्षाची निर्यात झाली व ५३५ कोटी निर्यातमूल्य मिळाले. यामध्ये राज्यातील ५० हजार ९३ टन द्राक्षाचा समावेश आहे व निर्यात मूल्य ४८४ कोटी आहे. तिसऱ्या स्थानावर केळी आहेत. देशातून ८२ हजार १५३ टन केळीची निर्यात झाली व २७८ कोटी निर्यातमूल्य मिळाले. यामध्ये २८ हजार ५२८ टन केळी एकट्या महाराष्ट्रातील असून त्यांना ९७ कोटी निर्यातमूल्य मिळाले आहे.
सन २०१६-१७ च्या हंगामात देशातून १२ हजार २९५ टन संत्र्याची निर्यात झाली व याद्वारे ३२ कोटी निर्यातमूल्य मिळाले. यामध्ये महाराष्ट्रातील २७३ टन संत्र्याचा समावेश आहे. राज्याच्या वाट्याला फक्त एक कोटी निर्यातमूूल्य मिळाले आहे. शासन अर्थसहाय्यीत तसेच अंगिकृत संस्था मात्र यापासून लांबच राहिल्या. फार तर महानगरात संत्रा महोत्सवा इतपतच त्यांनी मजल मारली. मात्र, काही सहकारी तत्वावरील संस्था व परप्रांतीय व्यापारी आणि अन्य राज्यांचे धोरण राज्याच्या तुलनेत पुढारलेले आहे. याचा थेट फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे. (प्रतिनिधी)

महानगरात ‘संत्रा महोत्सवा’तच धन्यता
थेट उत्पादक ते ग्राहकांपर्यंत विक्री यामध्ये दोन्ही घटकांना दर्जेदार व किफायतशीर माल मिळतो. महानगरातील व्यापाऱ्यांची येथील उत्पादकांशी भेट होऊन संबंध वृद्धींगत होतात व यामधून व्यापार बहरतो. ही संत्रा महोत्सवाची मूळ संकल्पना आहे. मात्र, अलीकडे ही संकल्पना हरविली यातून शासन निधीवर डल्ला मारण्याची प्रवृत्ती बोकाळू लागली आहे. शासना यंत्रणेच्या सहयोगाशिवाय हे शक्य नाही. अलिकडेच पुण्याला झालेल्या संत्रा महोत्सवात येथील संत्रा उत्पादकांचा नव्हे तर स्वस्त भावात विकत घेतलेला संत्रा विकत घेऊन पाठविण्यात आला व त्याची तेथे विक्री केली गेली. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असा आहे.

Web Title: Orange exports in fourth position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.