संत्र्याच्या आंबिया बहराला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 01:08 AM2018-08-19T01:08:11+5:302018-08-19T01:09:51+5:30
पावसाने १५ दिवस दडी मारल्याने संत्र्याच्या आंबिया बहाराच्या फळांना बुरशीजन्य अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होऊन गळती लागली आहे. १० ते १५ टक्केच फळे टिकण्याची शक्यता असल्याने संत्राउत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. यंदाही अस्मानी संकट ओढवण्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : पावसाने १५ दिवस दडी मारल्याने संत्र्याच्या आंबिया बहाराच्या फळांना बुरशीजन्य अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होऊन गळती लागली आहे. १० ते १५ टक्केच फळे टिकण्याची शक्यता असल्याने संत्राउत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. यंदाही अस्मानी संकट ओढवण्याचे चित्र आहे. कृषी विभागाने यावर संशोधन करून उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी संत्रा उत्पादकांकडून केली जात आहे.
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुक्याची ओळख केवळ संत्रा पिकामुळे आहे. हजारो हातांना काम देणारी संत्र्याची बाजारपेठ आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात येथून चवदार संत्र्याची निर्यात केली जाते. जिल्ह्यातून सर्वाधिक २० हजार ६०० हेक्टरचे संत्रा क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक नाही. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक पिकांनी माना खाली टाकल्या, तर संत्र्याच्या आंबिया बहराची फळे काही दिवसांत तोडण्यायोग्य होत असताना बुरशीजन्य अज्ञात रोगाचा कहर झाल्याने मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने पाठ फिरविल्याने तापमानामध्येसुद्धा वाढ झाली आहे. संत्रा आंबिया बहाराचे पीक हातातून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी तीव्र पाणीटंचाई आणि अतितापमानामुळे उन्हाळ्यात फळगळती झाली, उरलेली फळगळती आता होत असल्याने आंबिया बहराचे काय होणार, हा प्रश्न आहे.
आॅगस्ट महिन्यात बोट्रिओडिप्लोडिआ, कोलीटोट्रिकम व काही अंशी अल्टरनेरिया या बुरशीमुळे संत्रामध्ये फळगळ होत असून, बुरशी फळाच्या देठातून फळामध्ये आंत जावून पूर्ण वाढ झालेल्या फळाचे नुकसान करतात. अन्नद्रव्याची कमतरता हेसुद्धा कारण असण्याची शक्यता आहे. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून आल्यास, त्वरित पुरवठा केल्यास हा रोग नाहिसा होऊ शकतो.
- उज्ज्वल आगरकर, तालुका कृषी अधिकारी
जुलै ते आॅगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणावर संत्र्याच्या आंबिया बहराची फळे गळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार असल्याने शासनाने संत्राउत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक अनुदान जाहीर करावे.
- विजय श्रीराव,
माजी जिल्हा उपाध्यक्ष, भाजप
अज्ञात रोगामुळे फळगळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने केवळ १० ते २०टक्के संत्राफळे टिकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. संत्रा आंबिया बहर टिकला नाही, तर उत्पादकांना लाखोंचे नुकसान सोसावे लागेल. कृषी विभागाने सर्वेक्षण करून शेतकºयांना अनुदान द्यावे.
- उद्धव फुटाणे,
संत्राउत्पादक, तिवसाघाट