‘विदर्भाच्या कॅलिफोर्निया’तील संत्री मातीमोल, दर नीचांकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 12:18 PM2020-11-04T12:18:38+5:302020-11-04T12:20:35+5:30
Orange farmer Amravati news विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या रसाळ संत्र्याला भाव नसल्याने संत्राउत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या रसाळ संत्र्याला भाव नसल्याने संत्राउत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ५० रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ १२ ते १५ रुपये प्रतिकिलोवर आला असून, २०० रुपये क्रेटने शेतकऱ्यांची संत्री विकली जात असल्याचे चित्र आहे.
अतिपावसामुळे यावर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत संत्राबागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. त्यामध्ये संत्राउत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्या संकटावर मात करून शिल्लक राहिलेल्या संत्राफळांवर लाखो रुपये खर्च करून विविध फवारण्या व उपाययोजना करून फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकवून ठेवले. मात्र, अचानक आता संत्र्याला भाव मिळत नसल्याने जरूड तसेच वरूड व मोर्शी तालुक्यांतील संत्राउत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत.
मोर्शी आणि वरूड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संत्राबागा आहेत. लॉकडाऊनच्या टाळेबंदीमुळे सर्वत्र वाहतूक बंद होती. त्यावेळी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात संत्री असूनदेखील भाव नसल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यावर्षी आंबिया बहराची फूट चांगली झाली होती. मात्र, जुलै ते ऑगस्ट महिन्यात बागांमध्ये ३५ ते ५० टक्के संत्री गळून पडली. आता उर्वरित मालाला संत्राउत्पादक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. मध्यंतरी अतिपावसामुळेही काळे व पिवळे डाग पडून फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली होती. त्यातून वाचलेल्या संत्र्यालाही भाव नसल्याने संत्रा बागायतदारांची कोंडी झाली आहे.
१२०० ते १५०० रुपये भाव
सध्या संत्र्याला १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यंदा आंबिया बहराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्राउत्पादक शेतकऱ्यांना होती. संत्रा उत्पादनाला चांगला भाव मिळून पैसा हातात येईल, या आशेवर असलेला शेतकरी होता. भीषण दुष्काळ, टोळधाड, फळगळ, पानगळ, कोरोना या सर्व संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भावामुळे मातीमोल भावाने विक्री होत असल्याने आता तरी संत्राल्या राजाश्रय मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.