हजारो हेक्टरमध्ये संत्रागळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:09 AM2019-08-07T01:09:03+5:302019-08-07T01:09:46+5:30
कोरड्या दुष्काळात पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी संत्राझाडासह आंबिया बहर टिकविला. मात्र, आता अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात संत्राफळांना गळती लागल्याने शेतकरी हादरून गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : कोरड्या दुष्काळात पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी संत्राझाडासह आंबिया बहर टिकविला. मात्र, आता अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात संत्राफळांना गळती लागल्याने शेतकरी हादरून गेला आहे. तप्त उन्हाळा, कोरड्या पडलेल्या विहिरी व बोअर, प्रचंड पाणीटंचाई यातून सावरलेल्या शेतकऱ्यांवर गळतीच्या रूपात मोठे अस्मानी संकट कोसळले आहे.
वरूड तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर जमिनीमध्ये संत्राचे पीक घेतले जाते. सुमारे ७५ टक्के शेतकरी संत्र्याचे पीक घेतात. २०१८ साली कोरडा दुष्काळ पडल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला होता. विहिरी, बोअर आटल्याने तालुक्यात ८ हजार ४०० हेक्टर शेतजमिनीवरील संत्राझाडे सुकली होती. यातून संत्रा उत्पादक कसाबसा सावरला. परंतु, पावसाळा उशिराने आला आणि पुन्हा आंबिया बहराच्या संत्राफळाला गळती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. संत्राफळांचे देठ पिवळे पडून ती पिवळी पडल्यावर मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. झाडाखाली शेकडो संत्री गळून पडत असल्याने उत्पादक हवालदिल झाला आहे.
संत्रा उत्पादकांना जीवदान देण्यासाठी शासनाने आर्थिक मदतीसह कृषी विभागाकडून सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याची मागणी संत्राउत्पादक शेतकरी करीत आहेत.
कृषिमंत्र्याच्या मतदारसंघात संत्रा उत्पादकांची दैना
विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेला राज्याचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांचा हा मतदारसंघ अन् गृहजिल्हाही. या जिल्ह्यातील मोर्शी, वरूड, अचलपूर व चांदूरबाजार या चार तालुक्यात संत्र्यागळीचा प्रकार अधिक प्रमाणात आहे. मंत्रिमहोदयांचा दौरा झाला. वाळलेल्या संत्रा झाडासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतून मदत दिली जाणार असल्याचे ना. बोंडे यांनी सांगितले. मात्र, संत्राबागांमध्ये होत असलेल्या फळगळीबाबत चकार शब्द काढलेला नाही. संत्राउत्पादकांचे कोट्यावधीचे नुकसान होत असताना कृषी विभागदेखील पुढे सरसावला नसल्याचे वास्तव आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर आता कुठे जिल्हा प्रशासनाला जाग आली. आता कुठे संत्राझाडांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
संत्राउत्पादकांना हवी मदत
उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा जगविण्याकरिता पाण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. त्यातून कसाबसा सावरला असताना आता आंबिया बहराला गळती लागली. लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने संत्राउत्पादकांना शासनाने हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बेनोडाचे संत्राउत्पादक विवेक आलोडे यांनी केली आहे.