संत्रा बागांना टँकरने पाणी

By admin | Published: April 16, 2016 12:06 AM2016-04-16T00:06:12+5:302016-04-16T00:06:12+5:30

तालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळयात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु सध्या प्रकल्पात केवळ १२ ते १५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

Orange water tanker water | संत्रा बागांना टँकरने पाणी

संत्रा बागांना टँकरने पाणी

Next

पाणीटंचाई : २१ हजार हेक्टरमधील बागा जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न
संजय खासबागे  वरूड
तालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळयात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु सध्या प्रकल्पात केवळ १२ ते १५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. सिंचन विहिरींची पातळी खालावल्यामुळे दिवसभर चालणारे पंप आता केवळ अर्ध्या तासांवरच आले आहेत. भूजल पातळी ४० ते ५० फुटांवर गेल्याने तालुक्यातील २१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रामधील संत्राबागा मरणासन्न अवस्थेत आहेत.
तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रा लागवडीखाली असून यापैकी १७ हजार हेक्टर जमिनीत फळधारणा करणारी तर पाच वर्षांपर्यंतची पाच हजारांपेक्षा अधिक संत्रा झाडे आहेत. गहू, हरभरा, मका, मिरची, पालेभाज्यांसह विविध बागायती पिके येथे घेण्यात येतात. या पिकांनासुध्दा वेळेवर सिंचनाची गरज असते. तालुक्यात ९ सिंचन प्रकल्प असून हजारो हेक्टर सिंचनाची क्षमता आहे. परंतु काही दिवसांपूर्वीपर्यंत १०० टक्के पाणी असलेले हे प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर असून यामध्ये केवळ १५ ते २० टक्केच जलसाठा उरला आहे. मार्च महिन्पूर्वीच हे प्रकल्प कोरडे पडू लागले होते. बोअरवेलचे पाणी ७०० ते ८०० फूट खाली गेले असून विहिरींची पातळी ४० ते ५० फूट खालावली आहे. एरवी दिवसभर पाण्याचा उपसा करणाऱ्या विहिरींमधून आता अर्ध्या तासांच्यावर पाणी येत नाही. यामुळे पुरेसे सिंचन होऊ शकत नाही. विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री ओलिताकरिता शेतावर जावे लागते. भारनियमनामुळेसुध्दा शेतकरी हैराण झाले आहेत. उपजिविकेचे प्रमुख साधन असलेल्या या संत्राझाडांना जीवदान देण्याकरिता प्रतीफेरी ६०० ते ७०० रुपयांप्रमाणे पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टँकरमधील हे पाणी विहिरीत ओतून नंतर पंपाच्या सहाय्याने ठिबक सिंचनाद्वारे ओलीत केले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना सहा ते सात हजारांचा खर्च येतो. संत्रा, मोसंबी कलमांची निर्मिती करणाऱ्या नर्सरींवर तापमानाचा परिणाम होऊन संत्रा, मोसंबीच्या कलमा सुकण्याच्या मार्गावर असल्याने लाखोंचा फटका नर्सरीधारक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राणप्रीय संत्रा बागा जगविण्याची जीवपाड धडपड शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर
पुसला, धनोडी, मालखेड, शेंदूरजनाघाट, आमनेर, राजुराबाजार, बारगाव, बेनोडा, गोरेगाव, नागझरी, टेंभुरखेडा, शेंदूरजनाघाट, तिवसाघाट, जरुड, मांगरुळी लोणी, करजगाव, सांवगा परिसरातील भूजल पातळी कमालीची घटल्याने सिंचन विहिरी खोल गेल्या तर चार ते पाच तास चालणारे पंप केवळ १५ ते २० मिनिटेच चालायला लागले. यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांनी संत्रा जगविण्याकरिता टँकरने पाणी शेतात नेऊन विहिरीत टाकून ओलीत करणे सुरु केले.

दररोज आठ ते दहा टँकर पाण्याचा वापर
सिंचनाकरिता पाणी नसल्याने येथील शेतकऱ्यांना त्यांची संत्र्याची झाडे वाचविण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रतिफेरी ६०० ते ७०० रुपये खर्च करून दिवभरात ८ ते १० टँकर पाणी विहिरीत सोडून शेतकऱ्यांना रात्री ठिबक सिंचनाव्दारे ओलीत करावे लागत आहे. संत्रा जगविणे शेतकऱ्यांसाठी जिकरीचे झाल्याचे बेनोडा येथील युवा शेतकरी विवेक आलोडे यांनी सांगितले.

नर्सरीधारकांनाही लाखोंंचा फटका
वरुड तालुक्यात संत्राबागांसह ५०० पेक्षा अधिक नर्सरीधारक आहेत. यामध्ये अधिकृत परवानाधारकसुध्दा आहेत. येथे कोट्यवधींच्या संत्रा, मोसंबी कलमांचे उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी भूजलपातळी खालावल्याने सिंचनाची समस्या आ वासून उभी असल्याने संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे त्याचप्रमाणे संत्रा, मोसंबी कलमांची निर्मिती करणाऱ्या नर्सरीधारकांवरही संक्रांत आली आहे.

Web Title: Orange water tanker water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.