ग्राम कृषी समितीसाठी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:13 AM2021-05-18T04:13:56+5:302021-05-18T04:13:56+5:30
अमरावती : नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी समिती संजीवनी समिती गावात स्थापन करण्यासाठी ऑनलाईन ई-ग्रामसभा आयोजित करण्याचे ...
अमरावती : नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी समिती संजीवनी समिती गावात स्थापन करण्यासाठी ऑनलाईन ई-ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व गटविकास अधिकारी (बीडीओ) मार्फत ग्रामपंचायतींना १७ मे रोजी दिले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना विविध लाभाविषयक अर्जाना मंजुरी देण्याचे अधिकार गावातील ग्राम कृषी संजीवनी समितीला आहेत. तथापी नव्याने निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये अद्याप ग्राम कृषी संजीवनी समितीची स्थापना झालेली नसल्याने शेतकऱ्यांच्या कृषीविषयक लाभांना मंजुरी देण्यासाठी बहुतांश प्रकरणे समितीस्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे सदरचे अर्ज मंजुरीबाबत शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांचेकडून वारंवार विचारणा होत असून याबाबत वरिष्ठ अधिकारी यांचेकडून नियमित आढावा घेण्यात येत आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायतींनी ग्रामसभेच्या मान्यतेने ज्या गावांमध्ये ग्राम कृषी समिती संजीवनी समितीची स्थापना करावयाची आहे. त्या ठिकाणी दिलेल्या सूचनेप्रमाणे ऑनलाईन ग्रामसभा घेऊन तातडीने ग्राम कृषी संजीवनी समितीची स्थापना करण्यात यावी, असे निर्देश सीईओं पंडा यांनी दिले. सदरची ग्रामसभा कोविड -१९ नियमावलीचे काटेकोर पालन केले जाईल. याची दक्षता घ्यावी, ग्रामसभा आयोजित करून समितीची स्थापन करण्याची कार्यवाही २६ मे पूर्वी करून तसा अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी यांना सादर करावा लागणार आहे.