डेंग्यूप्रकरणी चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:24 AM2018-08-24T01:24:02+5:302018-08-24T01:25:01+5:30
प्रतिबंध शक्य असतानाही शहरात आश्चर्यकारकरित्या वाढलेल्या डेंग्यूप्रकरणी चौकशीचे आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी महापालिका प्रशासनाला गुरुवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रतिबंध शक्य असतानाही शहरात आश्चर्यकारकरित्या वाढलेल्या डेंग्यूप्रकरणी चौकशीचे आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी महापालिका प्रशासनाला गुरुवारी दिले. नागरिकांच्या जीविताशी खेळू नका, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले.
शहरातील डेंग्यूची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी गुरुवारी ना.पाटील यांनी शहरातील निवडक डॉक्टरांची येथील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय रुग्णालयात बैठक घेतली.
या बैठकीची वेळ का आली?
अमरावती : या डॉक्टरांमध्ये अमरावती आयएमएचे अध्यक्ष तथा पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. समीर चौधरी, डॉ. अनिल रोहनकर, डॉ. अजय डफळे, डॉ. नितीन सोनोने, डॉ. सोमश्वर निर्मळ, डॉ. वसंत लवणकर, डॉ. अनंत काळबांडे यांचा समावेश होता. महापालिका आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, महापालिका आरोग्य अधिकारी सीमा नैताम, वैद्यकीय अधिकारी मानसी मुरके, स्वच्छता भारत मिशनच्या समन्वयक श्वेता बोके यांचीही यावेळी उपस्थिती होती.
बैठकीपूर्वी डॉ. रणजित पाटील यांनी दस्तूरनगर भागातील डॉ. समीर चौधरी यांच्या रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली. तेथे त्यांना ९० टक्के डेंग्यूचेच रुग्ण आढळले. बैठकीच्या प्रारंभी महापालिकेने केलेल्या उपाययोजना ना. पाटील यांनी जाणून घेतल्या. महापालिका अधिकाºयांनी डेंग्यूबाबत आकडेवारी सादर केली. डॉ.रणजित पाटील यांनी डेंग्यूबाबतचा 'एसओपी' (स्टँडर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर) तक्ता मागितला. या तक्त्यात विविध रंगांनी शहरातील कुठल्या भागात डेंग्यूची घनता किती, याची अचूक माहिती नमूद केलेली असते. महापालिका प्रशासनाने अशा साथीच्या आजारांदरम्यान या पद्धतीने माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. तथापि 'एसओपी'नुसारची माहितीच महापालिका आयुक्तांकडे उपलब्ध नव्हती. या मुद्यावर ना.डॉ. पाटील संतप्त झाले. 'होमवर्क नाही' अशा शब्दांत त्यांनी आयुक्त आणि अरोग्य अधिकाºयांंवर नाराजी व्यक्त केली. इतर महापालिकेकडून कार्यपद्धती माहिती करून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. महापालिकेकडे काय व्यवस्था उपलब्ध आहेत आणि कशा उपाययोजना केल्यात, हे सांगण्याचा प्रयत्न करणाºया आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम यांना 'आपल्याला येथे बसून मंथन करण्याची वेळ का आली?' असा प्रतिप्रश्न ना.पाटील यांनी केला. आकड्यांचा खेळ खेळू नका. महापालिका ही जबाबदार संस्था आहे. जे असेल ते प्रामाणिकपणे समोर आणा. फवारणी, धुवारणीचा कार्यक्रम आखा. ज्या दिवशी ज्या परिसरात चमू जाईल त्याची आधीच जाहिरात करा. त्यामुळे तेथील लोक सतर्क असतील. ज्यांच्याकडे फवारणी झाली असेल, त्यांची स्वाक्षरी, मोबाइल क्रमांक घ्या. जे काही केले, ते वृत्तपत्रातून जाहीर करा. लपवाछपवी बंद करा. प्रभावी उपाययोजनांसाठी सप्ताह पाळा, असे ते म्हणाले.
डॉ. निचत यांची सात पत्रे बेदखल
डेंग्यूने महानगराला विळखा घातला. रुग्ण वाढत असल्याने वेगळ्या उपाययोजनांसाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, या आशयाचे पत्र सात वेळा डॉ. मनोज निचत यांनी महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या पत्रांची दखल घेतली नसल्याचे वास्तव गुरुवारी ना. रणजित पाटील यांच्यासमक्ष उघडकीस आले.
-तर बांधकाम मोजमापाची नोटीस मिळते
डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे वास्तव निदर्शनास आणल्याबद्दल आपल्या रुग्णालयाचे बांधकाम मोजण्यासाठी महापालिकेकडून नोटीस बजावली जाते. हा कसला न्याय, असे प्रश्न डॉ. मनोज निचत यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या पुढ्यात ठेवले. त्यावर ‘व्हिसल ब्लोअर’करिता महापालिकेची ही कृती संयुक्तिक नाही, चौकशी करु, असे डॉ. रणजित पाटील यांनी जाहीर केले.