एक लाखाच्या ठेवीसह १५ हजार देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:00 PM2018-11-30T23:00:36+5:302018-11-30T23:00:52+5:30
ठेवीदाराला नाहक त्रास दिल्याचा ठपका ठेवत ठेवीची १ लाखाची रक्कम व १५ हजारांचा लाभ देण्याचे आदेश ग्राहक मंचाने परतवाडा येथील दि खामगाव अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेला दिले. त्यामुळे ठेवीदाराला दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ठेवीदाराला नाहक त्रास दिल्याचा ठपका ठेवत ठेवीची १ लाखाची रक्कम व १५ हजारांचा लाभ देण्याचे आदेश ग्राहक मंचाने परतवाडा येथील दि खामगाव अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेला दिले. त्यामुळे ठेवीदाराला दिलासा मिळाला आहे.
परतवाडा येथील मालादेवी शामसुंदर वर्मा यांनी ११ आॅक्टोबर २०१७ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार नोंदविली होती. त्यांनी खामगाव अर्बन बँकेच्या शिशू सुरभी ठेव योजनेंतर्गत पाच हजारांची रक्कम २० वर्षांसाठी गुंतविली. मुदतीनंतर एक लाख रुपये मिळतील, अशी ती योजना होती. २०१६ मध्ये मुदत संपल्यानंतर मालादेवी वर्मा यांनी बँकेला रकमेची मागणी केली. बँकेने ही मागणी नाकारली. रिझर्व्ह बॅक आॅफ इंडियाने व्याजाचा दर कमी केल्याने ६३ हजार ६५६ रुपये देण्याची तयारी दर्शविली. मात्र, ही रक्कम स्वीकारण्यास मालादेवी वर्मा यांनी नकार दिला. कराराच्या वेळी ठेवीदाराला ज्या व्याजदराने परतफेड करायची होती, ती न करता खामगाव अर्बन बँकेकडून रिझर्व्ह बँकेच्या दस्तांच्या आधारे बहाणा करीत असल्याचे आढळले. त्यामुळे सदर संस्थेने सेवेत त्रुटी केली, अनुचित व्यापारी प्रथा अवलंबिली, असा निष्कर्ष ग्राहक मंचाचा आहे. या प्रकरणात ग्राहक मंचाचे दोन्ही बाजू ऐकून घेतल्या.
सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद झाला. त्यानंतर ग्राहक मंचाने आपले मत व्यक्त केले. खामगाव अर्बन बँक व बँकेचे संचालक किंवा त्यांच्यावतीने पात्र अधिकाऱ्याने तक्रारदाराला १ लाखांची रक्कम व त्यावर ९ डिसेंबर २०१६ पासून दरसाल दरशेकडा १० टक्के दराने व्याज द्यावे तसेच शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासाकरिता नुकसानी रक्कम १५ हजार रुपये द्यावेत, असा निकाल ग्राहक मंचाने दिला. या निर्देशाचे पालन ३० दिवसांच्या आत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.