अवयव दानामुळे इतरांच्या जीवनात फुलू शकतो आनंद
By admin | Published: August 13, 2016 12:06 AM2016-08-13T00:06:24+5:302016-08-13T00:06:24+5:30
जनमानसामध्ये अवयव दानाचे महत्त्व वाढविण्यासाठी व त्यांना अवयव दानासाठी प्रवृत्त करण्याकरिता...
अमरावती : जनमानसामध्ये अवयव दानाचे महत्त्व वाढविण्यासाठी व त्यांना अवयव दानासाठी प्रवृत्त करण्याकरिता दरवर्षी १३ आॅगस्टला शासकीय संस्था तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्था अवयव दान दिन साजरा करण्यात येतो. अवयव दान हे श्रेष्ठदान असून अवयवदानामुळे अनेकांच्या जीवनात आनंद फुलू शकतो व आजारी मनुष्याला जीवनदान मिळू शकतो.
महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे दरवर्षी ५ लक्ष रुग्ण मरण पावातत. खरे म्हणजे त्यांना जीवन जगण्याची इच्छा असते. परंतु त्यांना जर अवयव मिळू शकला तर ते नक्कीच सुकर जीवन जगू शकतात. या करिता जनमानसामध्ये अवयव दानाविषयी जागृती निर्माण करुन जास्तीत जास्त लोकांनी या करिता तयार होणे गरजेचे आहे. आज ज्याप्रमाणे रक्तदान चळवळ राबविल्या जाते त्याच धर्तीवर ती अवयव दानाची चळवळ राबविणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतांना ज्यांनी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेवर कार्य केले व त्यांच्या अथक प्रयत्नानंतर ही शस्त्रक्रिया सफल करून दाखविली त्या सर्व डॉक्टरांची संपूर्ण मानवजात ऋणी राहणार आहे. तसेच हा त्यांचा सन्मान आहे. भारतात दरवर्षी साधारणपणे दीड लाख किडनीच्या तर ११ लाख लोक डोळ्यांच्या दानाच्या प्रतीक्षेत असतात.(प्रतिनिधी)
सुपर स्पेशालिटीत अवयवदान दिन
विभागात अवयव दानाविषयी जनजागृती होण्याचे दृष्टीने सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये शनिवारी अवयव दान दिन आ. सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता होत आहे. यानिमित्त पोस्टर प्रदर्शनी, रांगोळी तसेच माहिती पत्रकाचे वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्यामसुंदर निकम यांनी दिली.
हे अवयव करु शकतो दान
मुत्रपींड, यकृत, डोळे, फुफ्फुसे, हृदय, स्वादुपिंड, हृदयाच्या झडप्पा, कानाचे पडदे, हाडे, त्वचा.