सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपिकतेचा खरा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:12 AM2020-12-06T04:12:29+5:302020-12-06T04:12:29+5:30
अमरावती : सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपिकतेचा खरा आधार असल्याने तो वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे सेंद्रिय कर्बाची ...
अमरावती : सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपिकतेचा खरा आधार असल्याने तो वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे सेंद्रिय कर्बाची मात्रा ०.२० ते ०.३० टक्क्यांपर्यंतच आहे. शाश्वत शेती उत्पादनासाठी सर्व अन्नद्रव्यांसोबत सेंद्रिय कर्बाचा समतोल राखला गेला तरच आवश्यक अन्नद्रव्ये झाडाला उपलब्ध होत असतात, असे संशोधन श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य शशांक देशमुख यांनी नोंदविले. जागतिक मृदा दिनानिमित्त शनिवारी त्यांनी रहाटगाव येथील शेतकऱ्यांना माती परीक्षणासंदर्भात मार्दर्शन केले.
जेव्हा कार्बन वायू हवेत असतो तेव्हा पर्यावरण दूषित होते आणि हाच कार्बन वायू सेंद्रिय कर्बाच्या रुपात जमिनीत मिसळला गेला तर जमिनीची सुपिकता वाढविण्यास सर्वात महत्त्वाची भूमिका निभावतो. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त तितका जमिनीचा पोत सुधारतो. त्याकरिता पिकांचे अवशेष न जाळता त्यापासून चांगल्या प्रकारचे कंपोस्ट खत निर्माण केल्यास शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते. आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्ब आणि इतर अन्नद्रव्यांची किती उपलब्धता आहे, हे जाणून घेण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे.
बॉक्स
असे करावे माती परीक्षण
शेतातील मातीचे परीक्षण करून घेण्यासाठी जमिनीचा रंग, उतार आणि उत्पादकतेनुसार विभाग करून प्रत्येक भागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी जमा करावा. त्या जागेवरील काडीकचरा बाजूला करून १५ ते २० सेंटीमीटर खोल व्ही आकाराचा खड्डा करून त्यातील खडे विरहीत माती गोळा करावी. असे पाच ते दहा ठिकाणची माती एकत्र करून त्याचे चार भागात विभाजन करावे. अर्धा किलो माती कापडी पिशवीत भरावी. त्यावर शेतकऱ्यांनी आपले नाव, पत्ता, जमिनीचा सर्वे क्रमांक लिहून पिशवीवर लावावी. हा नमुना जवळच्या कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाच्या मृदा परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी द्यावा. प्राप्त माती परीक्षण अहवालाप्रमाणे आवश्यक असेल तेच अन्नद्रव्य घटक खताच्या रुपाने पिकांना द्यावे. त्यामुळे खतावरील खर्च कमी करून जमिनीच्या उत्पादकतेची शाश्वतता टिकविता येते, असे शशांक देशमुख म्हणाले.