अन्यायाविरोधात संस्थाचालक एकवटले
By admin | Published: June 23, 2017 12:08 AM2017-06-23T00:08:59+5:302017-06-23T00:08:59+5:30
शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून नियमानुसार शिक्षण संस्थेतील कारभार असतानाही जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून नियमानुसार शिक्षण संस्थेतील कारभार असतानाही जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे. त्यामुळे अन्यायकारक धोरणाविरोधात गुरूवारी शिक्षण उपसंचालक एस.बी. कुलकर्णी यांच्याकडे न्याय देण्यासाठी शिक्षण संस्था चालक व अन्यायग्रस्त शिक्षकांनी आवाज केला. यावेळी शिक्षण संस्थाचालक व शिक्षकांच्या वतीने शिक्षण उपसंचालकांना मागणीचे निवेदन सोपविले आहे.
निवेदनकर्त्याच्या प्रमुख मागण्यांमध्ये भूमिपुत्र शिक्षण प्रसारक संस्थाव्दारा संचालित श्रीसंत गाडगेबाबा कनिष्ठ महाविद्यालय खोलापूर येथे तत्कालीन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वरराजूरकर यांच्या अध्यक्षतेत समिती व शिक्षण उपसंचालक यांच्या परवानगीने या महाविद्यालयातील अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गातील नोकर भरतीची नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केली. सदर नियुक्तीनंतर ३ वर्षांपासून सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत. मात्र वरील शिक्षकांना शिक्षण उपसंचालक यांच्याकडून मान्यता देण्यास टाळाटाळ केली जात आहे. परिणामी सदर शिक्षक वेतनपासून वंचित आहेत. त्यामुळे यापदांना मंजुरी द्यावी अथवा ही पदे रद्द करावी यापैकी एकही निर्णय शिक्षण उपसंचालकांकडून होत नसल्याचा आरोप या निवेदनात मधुकर अभ्यंकर यांनी केला आहे. यावेळी दिलीप कडू, मधुकर रोडे, नवरे, गजानन वानखडे आदी उपस्थित होते.