-तर मंत्र्यांच्या घरात तूर भरणार
By admin | Published: April 25, 2017 12:04 AM2017-04-25T00:04:50+5:302017-04-25T00:04:50+5:30
तूर खरेदी बंद करून शेतकऱ्यांची थट्टा व व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करीत आहे. शासनाने बंद केलेली तूर खरेदी तातडीने सुरू करावी, ..
बच्चू कडू : बाजार समितीत धडक, शेतकऱ्यांशी संवाद
परतवाडा : तूर खरेदी बंद करून शेतकऱ्यांची थट्टा व व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करीत आहे. शासनाने बंद केलेली तूर खरेदी तातडीने सुरू करावी, अन्यथा थेट मंत्र्यांच्या घरात तुरीचे पोत्यांची साठवणूक केली जाईल, असा इशारा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दिला. यामुळे बाजार समिती प्रशासनात खळबळ निर्माण झाली होती. तूर खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे, अशी तक्रार आ. कडू यांच्याकडे करण्यात आली.
-तर संबंधितांना जाब विचारू
परतवाडा : शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यावर त्यांनी थेट अचलपूर बाजार समितीकडे मोर्चा वळविला. उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार राजेंद्र करडे व अन्य संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी बाजार समिती यार्डात बोलावून घेतले. तूर खरेदी का बंद करण्यात आली याचा जाब त्यांनी प्रशासनिक अधिकाऱ्यांना विचारला. दरम्यान त्यांनी पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नाफेडची तूर खरेदी सुरू करावी व न्याय मिळवून द्यावा अन्यथा तुमच्या घरात तूर साठवून ठेवू, असा इशारा देण्यात आला. विदेशातून तूर आयात करणारे हे शासन शेतकऱ्यांची तूर विकत घेत नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी गजानन भोरे, अंकुश गायकवाड, मंगेश हुड, श्याम मालू, सतीश व्यास, दीपक भोटे आदी उपस्थित होते.
चांदुरात बच्चू कडू आक्रमक
चांदूरबाजार : येथील बाजार समितीत आधीच शेतकऱ्यांचे २१ हजार क्विंटल तूर शिल्लक असताना वरुड येथून नाफेडने १३ ट्रक तूर गोदामात ठेवण्यासाठी पाठविली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांची विक्रीसाठी आलेली तूर आधीच उघड्यावर असताना बाहेरून आलेली तूर खाली करू देणार नाही, अशी संतप्त भूमिका आ. बच्चू कडू यांनी घेतली आहे. स्थानिक बाजार समितीमध्ये अद्यापपर्यंत ४४ हजार ६३८ पोते तूर विक्रीसाठी आणली. त्यात २२ एप्रिलपर्यंत १०२२ शेतकऱ्यांचे २१ हजार ६१४ क्विंटल तुरीचे मोजमाप पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित हजारो क्विंटल तुरीचे मोजमाप होणेच बाकी असून, ही तूर ठेवण्याकरिता गोदामच शिल्लक नाहीत. अशी भयावह स्थिती असताना नाफेडच्या वरूड येथील अधिकाऱ्यांनी खरेदी केलेली तूर ठेवण्याकरिता १३ ट्रक भरून चांदूरबाजार येथे पाठविली. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांची तूर उघड्यावर पडली असताना वरूडहून आलेली तूर खाली करू नये, अशी सूचना बाजार समितीचे संचालक मंगेश देशमुख यांनी ट्रकचालकांना केली. सदर प्रकरण आमदार बच्चू कडू यांच्या निदर्शनास आणून दिले. माहिती मिळताच आ.बच्चू कडू, तहसीलदार शिल्पा बोबडेंसह बाजार समितीत दाखल झाले. शेडमध्ये व्यापाऱ्यांचे शेकडो क्विंटलमाल आहे. शेतकऱ्यांची न मोजलेली तूर उघड्यावर आहे. नाफेडतर्फे खरेदी बंद आहे. यावर आ. बच्चू कडू यांनी सचिव मनीष भारंबे यांना व्यापाऱ्यांची तूरशेडमधून तत्काळ उचला, अन्यथा पेटवून देऊ, अशी तंबी दिली. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तूर खरेदी सुरू करण्याबाबत चर्चा केली व वरूडहून आलेल्या सर्व माल परत पाठविला.
शासनाच्या आश्वासना प्रमाणे तुरीच्या अखेरच्या दाण्यापर्यंत खरेदी करावे, अन्यथा आम्ही मंत्र्यांच्या घरात तूर भरू. शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाल्यास संबंधिताना जाब विचारू.
- बच्चू कडू,
आमदार