- अन्यथा आधार कार्ड होणार निराधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:07 PM2018-07-25T13:07:33+5:302018-07-25T13:09:40+5:30
आपली विशिष्ट ओळख दर्शविणारे राष्ट्रीय ओळखपत्र सलग तीन वर्षे कुठल्याही कामासाठी न वापरल्यास ‘निराधार’ होणार आहे. असे आधार कार्ड रद्द करण्याचा निर्णय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने घेतला असल्याचे समजते.
सुमित हरकुट/
अमरावती: आपली विशिष्ट ओळख दर्शविणारे राष्ट्रीय ओळखपत्र सलग तीन वर्षे कुठल्याही कामासाठी न वापरल्यास ‘निराधार’ होणार आहे. असे आधार कार्ड रद्द करण्याचा निर्णय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने घेतला असल्याचे समजते.
यूआयडीएआयच्या निर्णयामुळे बँक खाते, पॅन कार्ड, मोबाइल फोन यांना आधार क्रमांक जोडणे बंधनकारक झाले आहे. आधार कार्ड व पॅन कार्ड यावरील नाव, जन्मतारीख, जन्मवर्ष आणि छायाचित्र यात तफावत आढळल्यास, आधारची जोडणी करता येणार नाही, असेही या प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, आधार कार्डवरील नाव, लिंग, जन्मतारीख, जन्मवर्ष इत्यादी चुका असल्यास, आधारचा वापर करताना समस्या निर्माण होऊ शकतात. अशा आधार कार्डमधील तपशिलात बदल करण्यासाठी नागरिकांना संबंधित केंद्रात सतत चकरा घालाव्या लागतात. अशांना दिलासा देण्यासाठी आता संगणकाद्वारा कुठलाही बदल नोंदविता येईल. मात्र, ज्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडला आहे, अशांनाच आधारसंबंधी माहितीत बदल प्राधिकरणाच्या संकेत स्थळावर करता येईल. हा बदल प्राधिकरणाने दिलेल्या मुदतीतच करणे बंधनकारक आहे. आधार कार्ड संलग्न करण्याची मुदत नुकतीच ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत ही मुदत तब्बल पाच वेळा वाढविण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
सर्वच ठिकाणी आधार बंधनकारक असले तरी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. परंतु, याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळेच सलग तीन वर्षे आधारचा वापर न केल्यास, ते निष्क्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्राधिकरणाकडून पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.