... अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही, नवनीत राणांचा सरकारला इशारा
By महेश गलांडे | Published: November 3, 2020 07:58 PM2020-11-03T19:58:20+5:302020-11-03T19:59:06+5:30
अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला
अमरावती - पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबद्दलची घोषणा केली. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीनं वितरित करण्यात येणार असल्याचंही जाहीर केलं. मात्र, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तोकडी असून अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे झाले नसल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका करत, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत देण्याची घोषणा केली.
अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. ‘यंदा मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक असणारे सोयाबीनचे पीक संपूर्ण हातातून गेले. यानंतर आता कपाशीवर मोठ्याप्रमाणात बोंड अळी व लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे आता कपाशीचे पीकसुद्धा वाया जात आहे. तेव्हा राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी.’ अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. तसेच, ‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 50 हजार रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जमा करावी, जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही. अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही’ असा आक्रमक इशाराही नवनीत राणा यांनी सरकारला दिला आहे.
राज्य सरकार म्हणतंय, केंद्राची मदत नाही
राज्य सरकारकडून शेती, फळपिकांसाठी हेक्टरी वाढीव मदत देण्यात आलेली आहे. मात्र केंद्राकडून अद्याप मदत आलेली नाही. निसर्ग चक्रीवादळ येऊन गेले. त्यात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून केंद्राकडून मदत येणार होती. मात्र १०६५ कोटी रुपये अद्यापही बाकी आहे. ऑगस्टमध्ये पूर्व विदर्भात पूर आला. त्याचेही ८१४ कोटी रुपये केंद्राकडून यायचे आहेत. जीएसटीची भरपाई थकलेली आहे. असे एकूण ३८ हजार कोटी रुपयांचं येणं आहे. यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. स्मरणपत्रं पाठवण्यात आली. मात्र अद्यापही मदत मिळालेली नाही, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.
असं असणार १० हजार कोटींचं पॅकेज-
कृषी, शेती घरासाठी- ५५०० कोटी
रस्ते पूल- २६३५ कोटी
ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा- १००० कोटी
नगर विकास- ३०० कोटी
महावितरण उर्जा- २३९ कोटी
जलसंपदा- १०२ कोटी