-तर ‘त्या’ २५ कोटींच्या कामांची चौकशी करु
By admin | Published: April 16, 2015 12:01 AM2015-04-16T00:01:05+5:302015-04-16T00:01:05+5:30
दोन ते अडीच वर्षांपासून थकीत असलेल्या विकासकामांच्या २५ कोटी रुपयांच्या देयकांचे वितरण शिल्लक आहे. ही
नवनियुक्त आयुक्तांचे संकेत : महापालिका कंत्राटदार धास्तावले
अमरावती : दोन ते अडीच वर्षांपासून थकीत असलेल्या विकासकामांच्या २५ कोटी रुपयांच्या देयकांचे वितरण शिल्लक आहे. ही कामे खरेच झाली काय? याचा शोध घेण्यासाठी त्रयस्थ एजन्सी नेमून चौकशी करण्याचा पवित्रा नव्या आयुक्तांनी बुधवारी घेतल्याने महापालिका कंत्राटदारांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.
महापालिका आयुक्त चंद्रशेखर गुडेवार यांनी मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बुधवारी त्यांना भेटणाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. याच श्रुंखलेत अमरावती महापालिका कंत्राटदार असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी गुडेवार यांचे स्वागत केले. यावेळी कंत्राटदार असोशियनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करताना थकीत २५ कोटी रुपये देयकांबाबत विषय छेडला असता आयुक्त गुडेवार यांनी झालेली कामे अस्तित्वात आहेत का, असा सवाल उपस्थित करुन कंत्राटदरांची दांडी उडविली. बांधकाम कशी केली जातात, याचे मला चांगले ज्ञान आहे. महापालिकेत काय सुरु आहे, हेदेखील अवगत असून चांगले कामे केल्यास एका दिवसात देयके देण्याची व्यवस्था करेल, अशी हमीदेखील त्यांनी दिली. मात्र, यापूर्वी झालेल्या विकासकामांची तपासणी करण्याचे ठरविले आहे. त्याकरिता त्रयस्त एजन्सी नेमण्याचा विचार असून जी कामे दोन ते अडीच वर्षांपूर्वी करण्यात आली आहेत, ती खरेच अस्तित्वात आहेत काय? याचा शोध घेतल्यानंतर थकीत देयकाबाबत निर्णय घेणार, अशी तंबी आयुक्तांनी कंत्राटदारांना दिली. नव्या आयुक्तांच्या कारभाराची आगळी झलक बघताच कंत्राटदारही अवाक् झालेत. जुन्या आणि झालेल्या विकास कामांची तपासणी करण्याचे बोलताना आयुक्त गुडेवार यांनी कंत्राटदारांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले. महापालिकेत होणारी कामे ही नागरिक भरत असलेल्या करातून होतात, याचे भान सुद्धा कंत्राटदारांनी ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला. टक्केवारीला लगाम लागेल याची चिंंता करु नका.चांगले काम करा यातच भले राहील, अन्यथा माझ्याशी गाठ आहे, हे सांगायला आयुक्त विसरलेत नाहीत. यावेळी नवनियुक्त आयुक्त गुडेवार यांचे कंत्राटदार असोशियनचे अण्णा गुल्हाने, प्रशांत उपाध्ये, राजेश वावरकर, राहुल प्रधान, कुणाल टिकले, अमर भेरडे, कन्हैय्या गुप्ता, पप्पू मालवीय, जीतू पंचघाम, अजय मोहोड आदींनी सत्कार केला.