Coronavirus positive story; अमरावती जिल्ह्यात १,५६१ गावांपैकी २७७ गावांनी वेशीवर रोखला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 09:19 AM2021-05-18T09:19:53+5:302021-05-18T09:20:33+5:30
Amravati news अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढलेला आहे. अशा भयावह परिस्थितीत जिल्ह्यातील एकूण १,५६१ गावांपैकी २७७ गावांत अद्यापपर्यंत कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढलेला आहे. अशा भयावह परिस्थितीत जिल्ह्यातील एकूण १,५६१ गावांपैकी २७७ गावांत अद्यापपर्यंत कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला नाही. गत वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून १६ मे २०२१ पर्यंत ही गावे कोरोनाविहीन ठरली आहेत.
कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरलेल्या या गावात यापुढे कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष खबरदारीसह कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृृती करावी, असे निर्देश मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सोमवारी १४ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतलेल्या बैठकीत दिलेत.
कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाच शिरकाव झाला आहे. त्यानंतर याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत गेला. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. गत मार्च २०२० मध्ये कोरोना संकटाला सुरुवात झाली. पण ३ एप्रिल २०२० पर्यंत जिल्हा कोरोनामुक्त होता. ४ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यात पहिला रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यांतर कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. जिल्ह्यातील १५६१ गावांपैकी २७७ गावांनी कोरानाला वेशीवर रोखले आहे. या गावात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले नाहीत. त्यामुळे या कोरोना मुक्त असलेल्या गावात यापुढे कोरोनाचा शिरकाव होऊ नये, याकरिता विशेष खबरदारी घेण्यासाठी गावात जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवावी. तसेच अन्य उपाययोजनांच्या अनुषंगाने सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी स्वत: या गावांकडे लक्ष देऊन गावे कोरोनापासून मुक्त ठेवण्यासाठी ग्राम दक्षता समिती, ग्रामपंचायतींही खबरदारी ठेवण्याचे निर्देश सीईओंनी दिले.
सीईओ देणार गावांना भेटी
सध्या कोरोनाचा संसर्गापासून दूर असलेल्या जिल्ह्यातील २७७ गावांत अद्याप कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले नाहीत. त्यामुळे यापुढे ही गावे कोरोनामुक्त राहावी, याकरिता आवश्यक खबरदारीचे निर्देश सीईओंना दिले आहेत. सीईओंच्या सूचनेप्रमाणे अंमलबजावणीही होत आहे की, नाही याची प्रत्यक्ष शहानिशा झेडपीचे सीईओ प्रत्यक्ष कोरोना मुक्त गावांना भेटी देणार आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात १५६१ गावांपैकी २७७ गावांत अद्याप कोरोना बाधित रुग्ण आढळलेले नाहीत. यापुढेही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता जनजागृतीसह अन्य उपाययोजनांचे निर्देश बीडीओंना सोमवारी दिलेत. या गावांना मी स्वत:ही भेटी देणार आहे.
- अविश्यांत पंडा,
मुख्यकार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद