आॅटोरिक्षातील आरसे काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 10:08 PM2017-12-09T22:08:41+5:302017-12-09T22:09:39+5:30
महिला प्रवाशांना आरशांतून बघणाऱ्या रिक्षाचालकांना धडा शिकविण्यासाठी कोतवाली पोलिसांनी दोन ते तीन दिवसांत आॅटोरिक्षांच्या आत लावलेले आरसे बाहेरच्या दिशेने लावण्याची मोहीम चालविली. ठाणेदारांच्या निर्देशावरून तब्बल २०० आॅटोरिक्षांची तपासणी करून पोलिसांनी ही कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिला प्रवाशांना आरशांतून बघणाऱ्या रिक्षाचालकांना धडा शिकविण्यासाठी कोतवाली पोलिसांनी दोन ते तीन दिवसांत आॅटोरिक्षांच्या आत लावलेले आरसे बाहेरच्या दिशेने लावण्याची मोहीम चालविली. ठाणेदारांच्या निर्देशावरून तब्बल २०० आॅटोरिक्षांची तपासणी करून पोलिसांनी ही कारवाई केली.
शहरातील महिला प्रवाशांना ने-आण करणाºया आॅटोरिक्षाचालकांचा मनमानी कारभार पोलिसांच्या निदर्शनास आला आहे. अनेक चालक विनापरवाना व वाहतूक नियमांना धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक करताना आढळून आले आहेत. त्यातच प्रवासी वाहतुकीसोबत काही आॅटोरिक्षाचालक गुन्हेगारीत उतरल्याचेही स्पष्ट झाले आहे. अपहरण, मुलींची छेडखानी, अल्पवयीन मुलींना प्रेमजाळ्यात अडकविणे अशाप्रकारचे गुन्हे गेल्या काही दिवसांत उजेडात आले आहेत. त्या अनुषंगाने कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांच्या वाहतूक पोलिसांनी मोहीम राबवून आॅटोरिक्षांची तपासणी केली व तब्बल २०० आॅटोरिक्षांमध्ये चालकांनी आत लावलेले आरसे हे बाहेरच्या दिशेने लावण्याचे काम केले. चालक महिला प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी आतील बाजूस आरसे लावत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
आॅटोरिक्षाचालक आतील भागात आरसे लावून महिला प्रवाशांवर लक्ष ठेवतात. ही बाब महिलांच्या सुरक्षेसाठी घातक ठरणारी ठरू शकते. त्या अनुषंगाने कारवाई करून आतील आरसे बाहेरच्या बाजूने लावण्यात येत आहेत. आतापर्यंत २०० आॅटोरिक्षांचे आरसे काढण्यात आले आहे.
- दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक.