शहरात प्रवासी वाहनांचे नियमबाह्य पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 10:21 PM2017-11-02T22:21:54+5:302017-11-02T22:22:06+5:30
येथील बसस्थानक चौकात प्रवासी वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.
सचिन मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : येथील बसस्थानक चौकात प्रवासी वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे दर्यापूर पोलिसांनी शहर वाºयावर सोडले का, अशी नागरिकांमध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक वाहने पूर्वीच्या न्यायाधीश निवासस्थानासमोर अवैधरीत्या पार्किंग केली जात आहेत.
दोन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने लोकदरबारात हा प्रश्न मांडला होता. तेव्हा पोलीस, नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्त कारवाई करून पार्किंगची सीमारेषा आखून दिली होती आणि काळी-पिवळी वाहने, ओम्नी व्हॅन, इतर प्रवासी वाहने व आॅटोरिक्षा शहराबाहेर काढल्या होत्या. त्यांना पोलीस प्रशासनाने मूर्तिजापूर टी-पॉइंट व अमरावती मार्गावर जागा दिली होती. आता पुन्हा ‘जैसे थे’ झाले असून, याकडे कुणाचेही लक्ष राहिले नाही.
भवानी हॉटेलच्या बाजूला जुने न्यायाधीशांचे निवासस्थान आहे. खासगी वाहतूकदारांची वाहने येथे अवैधरीत्या पार्किंग केली जात आहे. त्यामुळे दर्यापूर-अमरावती व दर्यापूर-मूर्तिजापूर या मुख्य मार्गाकडे जाणाºया वाहनांना अडथळा निर्माण होतो. याच मार्गावर प्रबोधन विद्यालय व अनेक कॉन्व्हेंट आहेत. त्यामुळे विद्यार्थी या मार्गावरून ये- जा करतात. अवैध पार्किंगला आळा घालण्यात दर्यापूर पोेलीस अपयशी ठरले आहेत.
पोलिसांची कारवाई शहराबाहेरच
दर्यापूर ठाण्यात ५० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. तथापि, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी स्थानिक ठाण्यांचे वाहतूक नियमनाचे अधिकार काढले. कुठलीही कारवाई करायची असेल, तर अमरावतीवरून वाहतूक पोलिसांचे पथक पाठविण्यात येते. ते शहराबाहेरच कारवाई करतात. त्यामुळे नागरिकांनाच कसरत करीत वाहने वाहतूक कोंडीतून काढावी लागतात.
नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन त्या ठिकाणी अधिकृत पार्किंग झोन करण्याबाबत चर्चा करण्यात येईल. अवैध वाहतूक होत असेल, तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दर्यापूर