प्रकोप; एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 02:11 PM2021-05-27T14:11:35+5:302021-05-27T14:12:00+5:30
Amravati news तेरा दिवसांपूर्वी वडील तर मायलेक केवळ सहा तासाच्या अंतरात कोरोनाच्या नियतीने हिरावून घेतले. दरम्यान धामणगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप आताही कायम असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.
मोहन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: तेरा दिवसांपूर्वी वडील तर मायलेक केवळ सहा तासाच्या अंतरात कोरोनाच्या नियतीने हिरावून घेतले. दरम्यान धामणगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप आताही कायम असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.
धामणगाव शहरातील रहिवासी प्रगतशील शेतकरी असलेल्या देशमुख कुटुंबातील तिघांचा कोरोनाने बळी घेतला. वडिलांचा तेरा दिवसांपूर्वी तर आई आणि मुलाचा एकाच दिवशी बुधवारी यवतमाळ येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला. अख्खे देशमुख कुटुंबच कोरोनाचे बळी ठरले आहेत.
गत आठवड्यात सोनेगाव खर्डा येथील दोन चुलत भावांपैकी एकाचा नागपूर तर दुसऱ्याचा अमरावती येथे एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तालुक्यातील दहा कोरोना रुग्ण अमरावती, नागपूर, यवतमाळ येथील खासगी व सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
धामणगाव तालुक्यातील ५८ गावात कोरोनाचा शिरकाव
शहर व तालुक्यातील २ हजार ३६३ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली. यात ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या तालुक्यात २५५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. या कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असला तरी आकडेवारी कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. मागील १४ दिवस जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या कडक निर्बंधाचे पालन ग्रामीण भागात पाहिजे त्या प्रमाणात झाले नसल्याने काही गावात आजही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही.
कोरोनाला सहज घेणे बेततेय जीवावर
मागील १५ दिवसांत कोरोना रुग्णाचा चढता आलेख, यात १५ वर्ष आतील रुग्णात होणारी झपाट्याने वाढ, सोबतच मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने कोरोना आजाराला सहज घेणे जीवावर बेतत आहे. प्रत्येक ग्रामस्थांनी घराबाहेर येऊन चाचण्या करून घ्याव्यात, यासाठी येथील तहसीलदार गौरवकुमार भळगाठींया हे घरोघरी जाऊन तपासणीसाठी आग्रह करीत आहे. तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर हे गावागावात चाचणी शिबिरे घेत आहेत. तर शहरात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे हे प्रत्येक चौकात चाचणी घेत आहेत. दोन दिवसाआड एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू होत असताना आजाराची भयावह ग्रामस्थांच्या केव्हा लक्षात येणार असा प्रश्न निर्माण होत आहे.