पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:52+5:302021-06-05T04:09:52+5:30
अमरावती : जिल्ह्यात जानेवारी ते मे दरम्यान डेंग्यू आजाराचे ६, चिकनगुनियाचे २ आणि मलेरियाचे २ रुग्ण आढळून आल्याचे जिल्हा ...
अमरावती : जिल्ह्यात जानेवारी ते मे दरम्यान डेंग्यू आजाराचे ६, चिकनगुनियाचे २ आणि मलेरियाचे २ रुग्ण आढळून आल्याचे जिल्हा हिवताप कार्यालयांतर्गत स्पष्ट करण्यात आले. कोरोनातून सवरत नाही तोच ऐन पावसाळ्याच्या तोंडावर यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
दीड वर्षापासून कोरोनाने नागरिक मेटाकुटीस आले असून, व्यवसायासह अनेकांचा रोजगार बुडाल्याने आर्थिक टंचाईचा सामना अनेकांना करावा लागत आहे. कोरोनाची दुसरी लाट जेमतेम ओसरल्याचे शुभ संकेत सद्यस्थितीवरून दिसत असल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यूचा प्रकोप वाढल्यास साथीचा फैलाव होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी शरद जोगी यांच्या मार्गदर्शनात पथकांद्वारे गावोगावी सर्वेक्षण, तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बॉक्स
मलेरियाचे दोन रुग्ण
जानेवारी ते मे २०२१ दरम्यान ९८ हजार ७०७ मलेरिया संशयितांचे रक्त नमुने घेऊन तपासणीला पाठविण्यात आले. त्यापैकी दोन रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह आढळून आले. डेंग्यू संशयित १२६ रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीला प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी सहा जण पॉझिटिव्ह आले, तर चिकनगुनियाचे संशयित १२६ रुग्णांचे रक्त नमुने तपासले असता, दोन पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी शरद जोगी यांनी दिली.
ग्रामीण भागात जनजागृती
पावसाळ्यात छतावर टाकाऊ वस्तू टायर, डबे, रबरी वस्तू पडलेल्या असतात. त्यात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने डासांच्या अळ्या तयार होतात. त्यापासून डासांची उत्पत्ती होत असल्याने अशा घरी भेट देऊन जनजागृती करण्यात येत आहे.
डबक्यांमध्ये गप्पी मासे
पावसाने ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचतात. त्यात डासांच्या अळ्या तयार होऊन डास उत्पत्ती होऊ नये, यासाठी अळ्या नष्ट करणाऱ्या गप्पी मासे डबक्यांमध्ये सोडण्याची मोहीम हिवताप कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
कोट
जून-जुलैमध्ये साचलेल्या पाण्याच्या डबक्यांत गप्पी मासे सोडण्याची मोहीम आमच्या पथकाक्द्वारा राबविण्यात येते. सध्या ग्रामीण भागात मोहीम सुरू आहे.
- शरद जोगी,
जिल्हा हिवताप अधिकारी