तिवसा तालुक्यात डेंग्यूचा प्रकोप वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:29+5:302021-08-21T04:16:29+5:30
तिवसा : तिवसा तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या एकही नसली तरी डेंग्यू आजाराची साथ सुरू असल्याने भीती व्यक्त ...
तिवसा : तिवसा तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या एकही नसली तरी डेंग्यू आजाराची साथ सुरू असल्याने भीती व्यक्त निर्माण होत आहे. गेल्या सहा दिवसात तिवसा नगरपंचायतीच्या हद्दीत तिघांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे, तर दीड महिन्यात तालुक्यात सहा जणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे तिवसा मतदार संघाच्या आमदार असलेल्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या मतदार संघात लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
१९ ऑगस्ट रोजी तिवसा नगरपंचायतीचे कर्मचारी सचिन देशमुख यांच्या १३ वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. कृष्णा सचिन देशमुख याला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. डेंग्यूची लागण झाल्याने त्याला अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देवांश प्रमोद वाट (१८ वर्षे, रा. तिवसा) हा अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्याचा मृतदेह पंजाबराव देशमुख रुग्णालयात दान करून एक आदर्श निर्माण केला. दि. १८ ऑगस्ट रोजी शिक्षक कॉलनी येथील अजय विजय रेवतकर (८ वर्षे) याचादेखील नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तीन आठवड्यापूर्वी माधवनगर येथील भावना प्रकाश दौड (वय २५ वर्षे) या विवाहित महिलेचादेखील डेंग्यूने मृत्यू झाला. तिवसा ग्रामीण रुग्णालयात आताही मोठ्या प्रमाणावर रुग्ण असून, येथे आता बेडही अपुरे पडत आहेत.
बॉक्स
तिवसा नगरपंचायतीवर गेल्या ८ महिन्यांपासून प्रशासन आहे. त्यामुळे या ठिकाणचा कारभार पूर्णतः हा वाऱ्यावर आहे. या ठिकाणी दररोज स्वच्छता केली जाते. शहरातील कचरा उचलून शहर नियमित स्वच्छ केले जात आहे, असा दावा नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येतो. मात्र, महिन्याला आठ ते दहा लाख रुपये स्वच्छतेवर खर्च करूनही शहर घाणीच्या विळख्यात अडकले आहे. नियमितपणे फवारणी करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे.