माता मृत्यूनंतर नातेवाईकांचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 11:07 PM2017-08-06T23:07:31+5:302017-08-06T23:08:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : माता व बालमृत्यूने नेहमीच चर्चेत असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात आणखी एका महिलेचा प्रसूतीदरम्यान शनिवारी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉक्टरांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी रेटून धरली होती. कारवाई करा, अन्यथा पार्थिव उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांसह रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याने तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.
भीमनगरातील रहिवासी राधिका मंगेश बनसोड (२१) या महिलेस शनिवारी दुपारी प्रसुतीसाठी डफरीनमध्ये आणण्यात आले होते. प्रसूतीकळा वाढल्याने तिला वॉर्डातून प्रसूतीगृहात नेण्यात आले. त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळबाळंतिणीची प्रकृती चांगली असल्याचे सांगून तेथील डॉक्टरांनी दोघांनाही वॉर्डामध्ये हलविले. मात्र, राधिका यांची प्रकृती ठिक नव्हती, त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ती बाब तेथील डॉक्टर व परिचारिकांना सांगण्यात आली. पुढे व्हा, आम्ही येतोच, असे सांगूनही ते उपचारासाठी आले नाहीत. त्यामुळे राधिकावर वेळेवर उपचार झाला नाही. दरम्यान दुपारी ४ वाजता राधिका यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर तपासणी करून डॉक्टरांनी मृत घोषित केले. डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने राधिकाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. या घटनेची माहिती रिपाइंचे जिल्हा संघटक अमोल इंगळे यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ डफरीन रुग्णालय गाठून वैद्यकीय अधीक्षक संजय वारे यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी त्याकडे गांभीर्याने बघितले नाही. त्यामुळे राधिकाचा मृतदेह रुग्णालयातून न उचलण्याची भूमिका रिपाइंने शनिवारी रात्री घेतली होती. दरम्यान पोलिसांनी डफरीन गाठून तणावाची स्थिती आटोक्यात आणली. याप्रकरणात नातेवाईकांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून दोषी डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रविवारीसुद्धा या प्रसूतेच्या शवविच्छेदनावेळी तणावपूर्ण वातावरण होते.
इन कॅमेरा शवविच्छेदन
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप केल्यानंतर इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमुने राधिकाच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन केले. नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहातून राधिकाचा मृतदेह न उचलण्याची भुमिका घेतल्यामुळे पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, चौकशीअंती दोषीवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पार्थीव ताब्यात घेतले.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून यासंबंधित तक्रार प्राप्त झाली आहे. याप्रकरणात मर्ग दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येईल.
- कैलास पुंडकर, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे