अमरावती जिल्ह्यात संत्र्याला अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 10:57 AM2020-06-05T10:57:30+5:302020-06-05T11:02:26+5:30
कोरोना, तापमानवाढ, विविध नैसर्गिक संकटे यांचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यातून सावरत नाही तोच टोळधाडीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सोबतच फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे. या अज्ञात रोगामुळे मोर्शी तालुक्यातील संत्राउत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे .
अजय पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: विक्रमी संत्राउत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या मोर्शी, वरूड तालुक्यात यंदा भीषण दुष्काळ, अज्ञात रोगाचे थैमान, बहराला गळती, गारपीट, कोरोना, तापमानवाढ, विविध नैसर्गिक संकटे यांचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यातून सावरत नाही तोच टोळधाडीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. पुन्हा बहराला गळती आणि झाडाची पाने पिवळी पडून गळत आहेत. सोबतच फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे. या अज्ञात रोगामुळे मोर्शी तालुक्यातील संत्राउत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे .
मोर्शी तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्राझाडे आहेत. संत्रा उत्पादक शेतकरी दोन बहरात उत्पादन घेतात. यामध्ये आंबिया व मृग बहराचा समावेश आहे. यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मृग बहराचा संत्रा बेभाव विकावा लागला. दुसरीकडे योग्य वातावरणामुळे खुललेला आंबिया बहर मात्र कडाक्याचे ऊन, संत्रागळती, पानगळ यामुळे लयाला गेला आहे.
मोर्शी तालुक्यातील घोडदेव, पाळा, सालबर्डी, डोंगर यावली, दापोरी, मायवाडी, हिवरखेड, भाईपूर, बेलोणा, अंबाडा आदी भागातील संत्रा बागांमधील आंबिया बहराला मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याने संत्राउत्पादक शेतकरी चिंतातुर झाले आहेत. कृषी विभागाने शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या चमूकडून तातडीने सर्वेक्षण करून उपाययोजना करावी, अशी मागणी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
लॉकडाऊनचाही फटका
संत्री वाहून नेणारे ट्रक लॉकडाऊन कालावधीत जागोजागी अडविण्यात आल्याने या फळाला अपेक्षित बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही. परिणामी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना या पिकाचा अपेक्षित लाभ झाला नाही. त्यातच आता टोळधाडीने उरलेसुरले नुकसान केले आहे. ड्रायझोनमध्ये असलेल्या मोर्शी, वरूड तालुक्यात संत्राउत्पादन हा शेतकऱ्यांच्या समृद्धीचा आधार आहे. हा आधार निसर्गाकडूनच हिरावून घेण्याचा प्रयत्न यंदा झाला. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकरी हवालदिल झाला आहे.
अज्ञात रोग, टोळधाड, आंबिया बहराच्या संत्र्याला गळती आणि आता पानगळ यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. संशोधकांनी संत्रा उत्पादकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी चर्चा करावी तसेच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या सर्वेक्षणाचे निर्देश कृषी विभागाला देणार आहे.
- देवेंद्र भुयार
आमदार
यंदा आंबिया बहराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होती. उत्पादनाला चांगला भाव मिळून हाती पैसा येईल, या आशेवर असलेला शेतकरी भीषण दुष्काळ, टोळधाड, बहराला गळती, पानगळ यांनी हवालदिल झाला आहे. नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले.
- रूपेश वाळके, अध्यक्ष, बळीराजा संत्रा उत्पादक संस्था .
सिंचनाची सुविधा नसतानाही शेतकऱ्यांनी जिवाचे रान करून संत्राबागा जगवल्या. यंदा चांगली फळधारणा झाली असताना, अचानक अज्ञात रोगामुळे गळती सुरू झाली आहे. सतत संकटांचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आता त्वरित आर्थिक मदत द्यायला हवी.
- नरेंद्र जिचकार, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.