ग्रामीण भागात दोन महिन्यांत ३० हजारांवर रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:10 AM2021-06-01T04:10:31+5:302021-06-01T04:10:31+5:30
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३० हजार १३५ कोरोनाग्रस्त रुग्ण ...
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३० हजार १३५ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एप्रिल महिन्यात १० हजार ९९२ कोरोना संक्रमित आढळले होते. १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. ३० मेपर्यंत ग्रामीण भागात १९ हजार १४५ कोरोना संक्रमित आढळले होते, तर ३६९ जणांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे.
गत दोन महिन्यांत जिल्ह्यात वरूड, मोर्शी, अचलपूर,चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, धारणी, चिखलदरा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, ग्रामीण भागात त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. नागरिकांकडूनही या उपाययोजनांबाबत सूचनांचे योग्य पालन होत नसल्याचे चित्र आहे. लसीकरणाबाबतही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी उदासीनता आहे. लक्षणे असलेल्या व्यक्ती तपासणीसाठी पुढे येत नाहीत. स्थानिक पातळीवर उपचाराला प्राधान्य दिले जात असल्याने संक्रमित अधिक आहेत.
दरम्यान, आता शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आकडेवारी दिसून येत आहे.
बॉक्स
एप्रिल व मे महिन्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या
अमरावती १३०७, भातकुली ८२८, मोर्शी २८०७, वरूड ५७८७, अंजनगाव सुर्जी २२१७, अचलपूर ४०७१, चांदूर रेल्वे १६५६, चांदूर बाजार २२३५, चिखलदरा १४४०, धारणी १५८२, दर्यापूर १५०५, धामणगाव रेल्वे १८१९, तिवसा १५७८, नांदगाव खंडेश्वर १३०३ असे एकूण ३० हजार १३५ रुग्ण आढळून आल्याची नोंद जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे आहे.