८८ हजार हेक्टरमधील संत्र्याला उष्माघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 11:24 AM2022-04-07T11:24:38+5:302022-04-07T11:30:35+5:30
पश्चिम विदर्भातील ८८,८४८ हेक्टरमधील संत्रा बागांमध्ये व्यवस्थापन नसल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान १०० कोटींचा फटका संत्रा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.
गजानन मोहोड
अमरावती : मार्च ‘हीट’चा तडाखा होताच ८ एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट आहे. याशिवाय यंदाचा उन्हाळा सर्वाधिक हॉट राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविली आहे. काही भागात आंबियाची गळ होत आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील ८८,८४८ हेक्टरमधील संत्रा बागांमध्ये व्यवस्थापन नसल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान १०० कोटींचा फटका संत्रा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.
सध्या दिवसाचे तापमान ४२ अंशांवर गेले आहे. अद्याप मे व जून शिल्लक आहे. उष्ण तापमानामुळे संत्रा, मोसंबी, लिंबू फळबागांमध्ये कोवळी नवती करपणे, आंबिया बहराच्या लहान फळांची गळ, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये ‘मर’, कोवळ्या रोपांचे शेंडे वाळणे, पाने गळणे, आदी दुष्परिणाम दिसू लागले आहेत. पीकेव्हीच्या संत्रा मिशन शास्त्रज्ञांनी पाहणीदरम्यान ही निरीक्षणे नोंदविली आहेत.
तापमानातील अचानक बदल किंवा उष्ण वाऱ्यामुळे अचानक तापमानवाढ होऊन किंवा ओलावा कमी झाल्यानेही फळगळ होण्याची शक्यता आहे. यासाठी झाडांमध्ये समतोल साधणे महत्त्वाचे आहे. याशिवाय झाडांच्या दोन ते तीन फूट परिघात गवत, पालापाचोळा, कुटार, तणस यासारख्या सेंद्रिय पदार्थांचे १० सेंमी आच्छादन महत्त्वाचे असल्याचे वरिष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. अनिल ठाकरे यांनी सांगितले.
उन्हामुळे बाष्पीभवन, पर्णोत्सर्जन अधिक
उन्हामुळे झाडातील पाणी उडून जाते. झाडे निस्तेज व मलूल पडतात. अशावेळी बाष्परोधकाचा वापर करून पर्णोत्सर्जन कमी करता येते. बाष्परोधकाची २ टक्के तीव्रतेची केओलीन किंवा पोटॅशिअम नायट्रेट एक टक्के तीव्रतेची फवारणी करावी. केओलीनची फवारणी हलके ओलीत झाल्यावर करावी. चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. नत्राची अर्धी मात्रा त्वरित द्यावी.
संत्रा, मोसंबी फळपिकांचे क्षेत्र
पश्चिम विदर्भात संत्र्याचे ८८,८४८ हेक्टरमध्ये क्षेत्र आहे. यामध्ये संत्र्याच्या आंबियाचे ३२,०३६ हेक्टर व मृग बहराचे ३५,७०७ हेक्टर क्षेत्र आहे. संत्र्याचे सर्वाधिक क्षेत्र अमरावती जिल्ह्यात ७५,३७१ हेक्टर आहे. बुलडाणा ३,४७५, अकोला ४,९७२, वाशिम ३,२५२ व यवतमाळ जिल्ह्यात १,७७७ हेक्टर क्षेत्र आहे. याशिवाय मोसंबीचे ४,६९१ व लिंबूचे १,७४४ हेक्टर क्षेत्र आहे.