चंद्रपूर येथे वाघांची संख्या ‘ओव्हर फ्लो’; विदर्भात वाघांचा कॉरिडॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 11:02 AM2021-07-22T11:02:17+5:302021-07-22T11:08:25+5:30

Amravati News व्याघ्र प्रकल्पाबाहेर पडणाऱ्या वाघांची सुरक्षितता धोक्यात आली, हेही तितकेच खरे आहे. जवळपास २४४ वाघ विदर्भात असल्याची नोंद घेण्यात आली आहे.

Over flow of Tigers in Chandrapur ; corridor of tigers in Vidarbha | चंद्रपूर येथे वाघांची संख्या ‘ओव्हर फ्लो’; विदर्भात वाघांचा कॉरिडॉर

चंद्रपूर येथे वाघांची संख्या ‘ओव्हर फ्लो’; विदर्भात वाघांचा कॉरिडॉर

Next
ठळक मुद्देसुरक्षितता धोक्यातवनविभागामार्फत ट्रॅप कॅमेऱ्यांनी मॉनिटरिंग

गणेश वासनिक

 लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : व्याघ्र प्रकल्पाबाहेरील राखीव जंगलात स्थलांतरित वाघांनी क्षेत्र व्यापले आहे. चंद्रपूर येथे वाघांची संख्या ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने ते वाघ आता यवतमाळपर्यंत पोहोचत आहेत. एकूणच विदर्भात वाघांनी स्वत:च कॉरिडॉर तयार केल्याचे चित्र आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्पाबाहेर पडणाऱ्या वाघांची सुरक्षितता धोक्यात आली, हेही तितकेच खरे आहे. जवळपास २४४ वाघ विदर्भात असल्याची नोंद घेण्यात आली आहे.

चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया, गडचिरोली, ब्रम्हपुरी या पूर्व विदर्भात वाघांची संख्या अधिक झाली आहे. वाघांना आता बफर झोन, कोअर एरिया कमी पडू लागल्याने त्यांनी सावज शाेधण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाबाहेर धाव घेतली आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया भागातील वाघांनी यवतमाळपर्यंत येण्याची मजल गाठली आहे. बुलडाणा येथील ज्ञानगंगा, वाशिम, पांढरकवडा आणि अकोला येथील राखीव जंगलात वाघांचे वास्तव्य आहे. मेळघाटातून वरूड, मोर्शी, सालबर्डीमार्गे मध्य प्रदेशातील जंगलात वाघांचा संचार वाढला आहे. राखीव वनक्षेत्रात वाघ असल्याची नाेंददेखील झाली आहे. बोर अभयारण्यातून गत दोन वर्षांपूर्वी चांदूर रेल्वे, पोहरा-मालखेड जंगलात वाघ आल्याची नाेंद आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, एकट्या विदर्भात ताडोबा-अंधारी, नवेगाव- नागझिरा, मेळघाट, पेंच, बोर अशी पाच अभयारण्ये आहेत. चंद्रपूर येथून यवतमाळ एमआयडीसीपर्यंत वाघांचा संचार वाढला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर,काटोल, रामटेक, वानडोंगरी, कोंढाळी असा कॉरिडॉर तयार झाला आहे. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघ स्थलांतरित होत असून, सीमेलगतच्या मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात मुक्त संचार करीत आहेत.

गडचिरोलीच्या जंगलात मानव-वन्यजीव संघर्ष नाही

गडचिरोलीच्या जंगलातही वाघ आहेत. मात्र, जंगलात नक्षलवाद्यांकडून टिपले जाऊ, या भीतीने येथे वाघांची शिकार करण्यात कुणी धजावत नाही. गडचिरोलीच्या जंगलात अंदाजे नऊ वाघ आहेत, परंतु येथे मानव-वन्यजीव संघर्ष नाही.

व्याघ्र प्रकल्पाबाहेरील राखीव वनांच्या परिसराची ‘टायगर बेअरिंग’ अशी नोंद असते. या भागात वाघ आढळल्यास त्याच्यावर ट्रॅप कॅमेरे, वनकर्मचाऱ्यांची पाळत ठेवली जाते. विदर्भात वाघांची संख्या वाढ झाली, हे खरे आहे. मात्र, स्थलांतरही वाढले आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक

------------------

अशी आहे विदर्भात वाघांची संख्या

गोंदिया- १०

भंडारा - ८

वर्धा (बोर) - ८

अमरावती (मेळघाट) - ४४

अकोला (काटेपूर्णा) - ५

बुलडाणा (ज्ञानगंगा) - ७

यवतमाळ, आर्णी - ५

पांढरकवडा - १०

गडचिरोली - ९

वाशिम - २

चंद्रपूर (ताडोबा-अंधारी) - ८५

नागपूर - १२

टिपेश्वर - २५

Web Title: Over flow of Tigers in Chandrapur ; corridor of tigers in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ