अतिउष्णतेने स्टीलच्या डब्यातील नोटाही जळाल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:18 PM2019-03-02T23:18:42+5:302019-03-02T23:19:05+5:30
येथील कॅम्प परिसरातील नाल्याच्या काठावरील पडप्याची सहा घरे गुरुवारी रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या भीषण आगीतून केवळ माणसेच बाहेर येऊ शकलीत. स्टीलच्या डब्यातील दागिन्यांसह रोख रक्कम अतिउष्णतेने पूर्णत: जळून खाक केले. सहा कुटुंबे उघड्यावर आल्याने त्यांना विविध संस्थांमार्फत भोजनाची व्यवस्था शनिवारीदेखील करण्यात आली.
अमरावती : येथील कॅम्प परिसरातील नाल्याच्या काठावरील पडप्याची सहा घरे गुरुवारी रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या भीषण आगीतून केवळ माणसेच बाहेर येऊ शकलीत. स्टीलच्या डब्यातील दागिन्यांसह रोख रक्कम अतिउष्णतेने पूर्णत: जळून खाक केले. सहा कुटुंबे उघड्यावर आल्याने त्यांना विविध संस्थांमार्फत भोजनाची व्यवस्था शनिवारीदेखील करण्यात आली.
कॅम्प भागातील नाल्याच्या काठावर मोलमजुरी करणारे लोक समुदायाने वास्तव्य करीत आहे. गुरुवारी रात्री १२.३० च्या सुमारास अचानक आग लागल्याचे एका व्यक्तीला दिसल्याने त्यांनी सतर्कतेचा इशारा दिला. आगीत आधार कार्ड, बँक पासबूकसह महत्त्वाची कागदपत्रे खाक झाले. एका विद्यार्थ्याचे दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र जळाल्याने त्याची परवड झाली.
आगग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी २० हजारांची मदत
सहा कुटुंबीयांना प्रत्येकी २० हजार रुपयांची तातडीची मदत नगरसेवक प्रणय कुलकर्णी, दिनेश बूब यांच्या सहकार्याने विविध संस्थांकडून देण्यात आली. सहाही कुटुंबांना दीडशे फुटांच्या खोली बांधकामासाठी लागणारे साहित्य देण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. मात्र, हे बांधकाम श्रमदानातून करावयाचे आहे. त्याला पीडितांसह शेजाऱ्यांनी होकार दिला.